सुभाष जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना एक पत्र लिहिले होते. या पत्रात जमिनीच्या वादातून सावकराने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केली होती.
मुंबई, 22 ऑगस्ट : राज्याचा गाडा जिथून हाकला जातो त्या मंत्रालयात (mantralaya) काही वर्षांपूर्वी धर्मा पाटील या वृद्ध शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. आता पुन्हा एकदा एका शेतकऱ्याने दोन दिवसांपूर्वी मंत्रालयाच्या गेटवर कीटनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दुर्दैवाने या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सुभाष जाधव (subhsh jadhav) असं या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते पुणे (pune) जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर इथं राहत होते. 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास सुभाष जाधव मंत्रालयाच्या परिसरात आले होते. त्यानंतर गार्डन परिसरात पोहोचल्यानंतर त्यांनी कीटनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. कीटनाशक प्राशन केल्यानंतर सुभाष जाधव जमिनीवर कोसळले. याच परिसरात तैनात असणाऱ्या पोलिसांच्या लक्षात ही बाब आली. सुभाष जाधव यांना तातडीने जी.टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, असं वृत्त टीव्ही ९ मराठी ने दिले आहे. सुभाष जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना एक पत्र लिहिले होते. या पत्रात जमिनीच्या वादातून सावकराने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केली होती. याबद्दल त्यांनी मंचर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. पण, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. सावकराने त्यांच्या जमिनीवर कब्जा केला आणि राहते घर सुद्धा पाडून टाकले. त्यांनी मुद्दल देण्यासाठी पैसे नव्हते, त्यामुळे मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला, असं सुभाष जाधव यांनी पत्रात नमुद केलं होतं. दुर्दैवाने आज त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एका शेतकऱ्याचा मंत्रालयात आत्महत्येच्या प्रयत्नात मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणी राज्य सरकार आणि गृहखाते काय कारवाई करणार हे पाहण्याचे ठरणार आहे.