मुंबई, 20 एप्रिल: मुंबईत प्रसारमाध्यमातील अनेक सहकाऱ्यांचे Covid-19 चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त अतिशय धक्कादायक असल्याचं राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. माझी माध्यम समूहांना विनंती आहे की, पत्रकारांना घरूनच काम करण्याची अनुमती द्यावी. जेथे व्हिज्युअल्सची अगदीच आणि अतिशय गरज आहे, तेथे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून काम करता येईल, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केलं आहे.
दुसरीकडे, राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही पत्रकारांबाबत चिंता व्यक्त केली आहे. मुंबईत 53 पत्रकार कोरोनाबाधित आढळले आहेत. पत्रकारांनी मोबाईलवरूनच बाईट घेऊन काम करावे. तसेच चॅनलच्या संपादकांना पत्रकारांची काळजी घ्यावी, अशा विनंती याआधीही केली होती, असं नवाब मलिक यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या 3 हजार 300 च्या वर गेली आहे. आता मुंबईत पत्रकारही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टर आणि पोलिस हे आघाडीवर आहेत. त्याच बरोबर पत्रकारही प्रत्यक्ष फिल्डवर राहून घटनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. आतापर्यंत डॉक्टर आणि पोलिसांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं होतं. आता पत्रकारही कोरोनाच्या विळख्यात अडकल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबईत आतापर्यत 53 जणांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यात पत्रकार, व्हिडीओ जर्नलिस्ट आणि फोटोग्राफर्स यांचा समावेश होता. या सगळ्यांनाच कुठलीही लक्षणं नव्हती. ही सर्व मंडळी प्रत्यक्ष फिल्डवर काम करणारी आहेत. सगळ्यांवर आता उपचार करण्यात येणार असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांचीही माहिती घेण्यात येत आहे. संकलन, संपादन- संदीप पारोळेकर