मुंबई, 04 जुलै : राज्यात मान्सून पाऊस अनेक ठिकाणी पडत आहे तर काही भागात अद्यापही पावसाने दडी मारली आहे. संपूर्ण कोकणात येत्या 4 ते 5 दिवसात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील चार-पाच दिवस मान्सून कोकणात अधिक सक्रिय होणार आहे. मुंबई ठाणे व आजूबाजूच्या परिसरात येत्या 4 ते 5 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. सध्या राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्यापही पाऊस पडताना दिसत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. सध्या मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात चांगला पाऊस पडत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, रायगड, पालघरच्या काही भागात येत्या 3 ते 4 तासांत पावसाच्या हलक्या सरी पडू शकतात. जूनमध्ये उघडीप दिलेल्या पावसाचा जुलैमध्ये काही भागात जोर वाढल्याचे चित्र दिसत आहे. पुण्यात मध्यम ते जोरदार सरी अनेक ठिकाणी पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, साताऱ्यातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसाळा सुरु होऊन एक महिना उलटला आहे तरी मराठवाड्यात अद्याप पावसाचा जोर नाही. अपेक्षाप्रमाणे पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी दुबारपेरणीच संकट बळीराजावर ओढवला आहे.
दरम्यान, पुढील 5 दिवसांत मध्य भारत, पश्चिम किनारपट्टीवर मान्सून अधिक सक्रिय होण्याची स्थिती आहे. पश्चिम किनारपट्टीवरील जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. कमी दाबाचे क्षेत्र उत्तर ओडिशा व लगतच्या दक्षिण झारखंड भागात होऊ शकते. परिणामी महाराष्ट्रात येत्या 5 दिवसात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.