अचानक पैशाची गरज
मुंबई, 15 एप्रिल : सध्याची वाढती महागाई पाहता अनेकजण त्यांच्या गरजा भागवण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतात. पैशांची गरज लागल्यास अनेकजण एकतर त्यांच्या मित्र-नातेवाईकांकडे पैसे उधार मागतात किंवा बँकेतून कर्ज घेण्यास प्राधान्य देतात. पण ज्यांच्यावर आधीच बँकेचं कर्ज आहे, त्यांना नवीन कर्ज मिळण्यात अडचणी येऊ शकतात. अशा लोकांसाठी ‘टॉप अप लोन’ हा उत्तम पर्याय आहे. ‘टॉप अप लोन’ याचाच अर्थ सध्याच्या कर्जावर अतिरिक्त कर्ज घेणं असा होतो. फोनमध्ये जसे टॉप अप रिचार्ज असते, अगदी त्याचप्रमाणे हे म्हणता येईल.
पर्सनल, होम किंवा कोणत्याही प्रकारच्या कर्जावर ‘टॉप अप लोन’ दिलं जातं. ही एक प्रकारची अॅड ऑन सुविधा मानली जाऊ शकते. बँक ही सुविधा फक्त त्यांच्या विद्यमान ग्राहकांसाठी देते. ‘टॉप अप लोन’मध्ये तुम्हाला अतिरिक्त व्याजदेखील द्यावं लागतं. हे व्याज सध्याच्या कर्जावर आकारल्या जाणाऱ्या व्याजदरापेक्षा वेगळं असू शकतं. वेगवेगळ्या बँका वेगवेगळ्या व्याजदरावर टॉप अप लोन देतात. असे आहेत बँकांचे व्याजदर एचडीएफसी बँकेच्या होम लोनवर टॉप अप लोन 8.30 ते 9.15 टक्के दरानं दिलं जातं. एसबीआय बँक 7.90 ते 10.10 टक्के, अॅक्सिस बँक 7.75 ते 8.40 टक्के, युनियन बँक 6.80 ते 7.35 टक्के, बँक ऑफ बडोदा होम लोनवर टॉप अप लोन 7.45 ते 8.80 टक्के आणि सिटी बँक होम लोन वर टॉप अप लोन 6.75 टक्के दरानं देते. वाचा - प्रॉपर्टी खरेदी करताय? मग हे डॉक्यूमेंट अवश्य करा चेक, अन्यथा… फायदे काय? बँक तुम्हाला सध्याच्या होम लोन किंवा पर्सनल लोनपेक्षा कमी व्याजदरानं कर्ज देते. तसंच, टॉप अप लोन घेतल्यानं तुमच्या सध्याच्या कर्जाचा कालावधी वाढत नाही. तुम्हाला पुन्हा बँकेच्या पेपर वर्कमधून जावं लागतं नाही. तुमच्याकडे तारण ठेवण्यासाठी काहीही नसतानाही तुम्हाला हे कर्ज मिळतं. तुम्ही घर बांधण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी टॉप अप लोन घेत असाल, तर तुम्हाला टॅक्समध्ये लाभ मिळू शकतो. टॉप अप लोन केव्हा घ्याल? तुम्ही आधीच बँकेचं कर्ज घेतलं आहे, आणि तुम्हाला पुन्हा पैशांची गरज आहे, पण त्यासाठी तुम्ही वेगळं कर्ज घेऊ इच्छित नाही, अशावेळी टॉप अप लोन घ्या. तसंच वेगवेगळी कर्ज प्रकरणं न करता एकाच बँकेत सर्व कर्ज मर्यादित ठेवायचं असेल, तर टॉप अप लोन हा एक चांगला पर्याय आहे. जर टॉप अप लोन खूप महाग होत असेल, तर त्याऐवजी नवीन कर्ज घेणं तुमच्यासाठी चांगलं आहे.