नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर : सणासुदीच्या काळात तुम्हाला घर खरेदीवर अनेक ऑफर्ससह चांगली डील्स मिळतील. मालमत्ता विक्री करणाऱ्या कंपनीव्यतिरिक्त, बॅंका तुम्हाला त्यांच्या वतीने अनेक आकर्षक डील्स देऊ शकतील. यासाठी सध्या बॅंकांकडून सरासरी 8 टक्के दराने कर्ज उपलब्ध होत आहे. या व्याजदराने तुम्ही 20 वर्षांसाठी कर्ज घेतलं तर तुम्हाला मूळ रकमेइतकंच व्याज द्यावं लागेल. याचाच अर्थ तुम्हाला तुमच्या घरासाठी दुप्पट रक्कम मोजावी लागेल. यामुळेच अनेक जण कर्ज घेऊन घर किंवा कोणतीही मालमत्ता खरेदी करणं टाळतात; मात्र तरुणांमध्ये मानसिकता बदलत असून ते आर्थिक बाबींमध्ये जास्त जागरूक झाले आहेत. अलीकडे बरेच जण 20 वर्षांत गुंतवणुकीच्या माध्यमातून व्याजाइतकी रक्कम उभी करण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून कर्ज संपेपर्यंत तुमचा घरावर झालेला खर्च तुमच्या गुंतवणुकीतून भरून निघेल. यामध्ये कोणत्याही म्युच्युअल फंडात केलेली एसआयपी तुम्हाला खूप मदत करू शकते. याविषयी जाणून घेऊ या. एसआयपीच्या माध्यमातून करा कर्जाच्या खर्चाची भरपाई समजा, तुम्ही 50 लाख रुपयांचं होम लोन घेतलं आणि 20 वर्षांत तुम्ही व्याजासह बॅंकेला एक कोटी रुपये दिले तर आता त्याची भरपाई कशी करायची असा प्रश्न तुम्हाला पडेल. एसआयपी हे त्यावरचं उत्तर असू शकतं. आकडेवारीवरून आपण हे समजून घेऊ. तुम्ही 50 लाख रुपयांचं होम लोन आठ टक्के वार्षिक व्याजदराने घेतलं असेल, तर तुमचा ईएमआय 41,822 रुपये असेल. तुमचं हे लोन 20 वर्षांसाठी असेल तर तुम्हाला एकूण 50.37 लाख रुपये व्याजापोटी भरावे लागतील. घराची किंमत तर 50 लाख रुपये आहे. यासाठी तुम्ही व्याजासह 1 कोटी 37 हजार रुपये खर्च केले. समजा तुम्ही ईएमआयच्या फक्त 25 टक्के म्हणजेच 10,912 रुपये गुंतवायला सुरुवात केली तर तुम्हाला यामध्ये अंदाजे 12 टक्के वार्षिक परतावा मिळू शकेल. या पद्धतीनं 20 वर्षांत तुमच्याकडे 1.1 कोटी रुपयांचा निधी तयार होईल. इक्विटी आणि डेट म्युच्युअल फंडमध्ये आहे ‘हा’ फरक; कशात गुंतवणूक करणं ठरेल फायद्याचं? एसआयपी म्हणजे काय? एसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग होय. याचाच अर्थ तुम्ही म्यु्च्युअल फंडात एका निर्धारित वेळेनंतर (1 महिना, 3 महिने, 6 महिने) पैसे गुंतवता. ही इक्विटी किंवा डेट म्युच्युअल फंडाची एसआयपी असू शकते. यामध्ये तुमचे पैसे अनुभवी फंडाद्वारे मॅनेज केले जातात आणि तुम्हाला दिवसभर स्टॉक्स पाहण्याची गरज भासत नाही. तुम्ही कोणत्या फंडाची निवड केली आहे, यावर त्यातली जोखीम अवलंबून असते. यासाठी इक्विटी म्युच्युअल फंडाचं उदाहरण पाहू. तुम्ही स्मॉल कॅप म्युच्युअल फंडात पैसे गुंतवले तर गुंतवणुकीवर जास्त रिटर्न मिळण्याची अपेक्षा करू शकता. परंतु, त्यात जोखीमदेखील जास्त असेल. त्याच वेळी लार्ज कॅप म्युच्युअल फंडामध्ये जोखीम कमी असेल. परंतु नफादेखील त्याच प्रमाणात कमी होईल. त्यामुळे तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये स्मॉल, मीडियम आणि लार्ज कॅप स्टॉक्सचं एक चांगलं मिश्रण करून पुढे जावं लागेल.