RBI कडून रेपो दर स्थिर
मुंबई, 6 एप्रिल : गेल्या काही महिन्यांपासून सतत वाढणारा रेपो दर रिझर्व्ह बँकेनं सध्या ‘जैसे थे’ स्थितीत ठेवला आहे. याचाच अर्थ सध्या 6.5 टक्क्यांवर असलेल्या रेपो दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. गेल्या काही महिन्यांमध्ये हा रेपो दर 2.5 टक्के वाढला आहे. यामुळे सामान्य नागरिकांवरचा आर्थिक बोजा वाढला होता. आता रिझर्व्ह बँकेने रेपो दर स्थिर ठेवल्याने सर्वसामान्य नागरिकांवरचा आर्थिक ताण हलका होईल की आणखी वाढेल, याबाबत जाणून घेऊ या. ‘सीएनबीसी टीव्ही 18’ने याबद्दल सविस्तर वृत्त दिलं आहे.
वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी रिझर्व्ह बँक रेपो दरात वाढ करते. मे 2023पासून आतापर्यंत रिझर्व्ह बँकेने 2.5 टक्के दरवाढ केली आहे. सध्याच्या पतधोरणात मात्र बँकेनं कोणतीही दरवाढ करणार नसल्याचं म्हटलंय. असं करून महागाईवर नियंत्रण मिळवण्यात किती यश मिळालं हे रिझर्व्ह बँकेला तपासायचं आहे. आतापर्यंत रेपो दरात झालेल्या वाढीमुळे अनेक किरकोळ कर्जांचे व्याजदर वाढले आहेत. काही गृहकर्जांचा कालावधी 20 वर्षांवरून 50 वर्षांपर्यंत वाढला आहे; मात्र रिझर्व्ह बँकेने आता रेपो दर स्थिर ठेवून सामान्यांना दिलासा दिला आहे. एकीकडे कर्जाचा जास्त कालावधी व वाढलेला व्याजदर यामुळे हैराण झालेल्या ग्राहकांवरचा आर्थिक ताण यामुळे हलका होईल. कर्ज फेडणाऱ्यांनी या संधीचा फायदा घेऊन लवकरात लवकर कर्जाची फेड केली पाहिजे. गेल्या काही दिवसांत बेंचमार्क रेपो दरात वाढ झाली असली, तरी गृहकर्ज व्याजदरांच्या स्प्रेडमध्ये घट झाली आहे. बँका रेपो दरापेक्षा अधिक दरानं आकारतात तो स्प्रेड असतो. आज रेपो दरावर सगळ्यात कमी स्प्रेड 1.90-2.00 टक्के आहे. रेपो दर आहे तोच राहिल्याने कर्जाचा वाढता कालावधी कमी करण्यासाठी मदत मिळू शकते. त्यामुळे ग्राहकांचे पैसेही वाचू शकतात. पैसे वाचवण्यासाठी शक्य असेल तेव्हा तुम्ही हप्ता वाढवू शकता. तसंच कर्जाचं प्री-पेमेंट करण्याचा प्रयत्न करू शकता. वाचा - नाशिककरांना आज दिलासा, पाहा किती रुपयांनी स्वस्त झालं सोनं रिझर्व्ह बँकेच्या या घोषणेमुळे शेअर बाजारात काही काळ तेजी आलेली पाहायला मिळू शकेल; मात्र ती दीर्घकालीन नसेल. लाँग टर्म बाँडचे भाव वाढतील. शॉर्ट टर्ममध्ये बाँड फंड एनएव्हीमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. बँक डिपॉझिट दर सध्या जास्त आहेत. त्यामुळे आता ग्राहक 3, 5 किंवा 10 वर्षं इतक्या जास्त कालावधीसाठी ठेवी ठेवू शकतात. एफडी ही तरुणांसाठी अल्पमुदतीच्या पैशांकरिता व वृद्धांसाठी व्याजाचं उत्पन्न म्हणून चांगली गुंतवणूक आहे; मात्र यात महागाईसाठी उपयुक्त परतावा मिळत नाही. त्यासाठी आर्थिक बाजारात गुंतवणूक करावी लागते. व्याजदर कमी झाला की बाँड्स एफडीच्या तुलनेत जास्त परतावा देऊ शकतात. इक्विटी म्युच्युअल फंडलाही बाजारातल्या तेजीचा फायदा होतो.