मुंबई, 20 ऑगस्ट : भविष्यातील आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आतापासूनच बचत करावी लागेल. बचतीसाठी आपण अशा योजनेत पैसे गुंतवले पाहिजेत जिथे आपले पैसे केवळ सुरक्षितच नाहीत तर चांगला परतावा देखील मिळेल. तुम्ही देखील अशी योजना शोधत असाल तर तुम्ही पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (RD) योजनेतील गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. पोस्ट ऑफिस आरडीची खास गोष्ट म्हणजे ही योजना सरकारच्या देखरेखीखाली चालते, त्यामुळे पैसे गमावण्याचा धोका नाही. आरडी खात्यात काही पैसे जमा करूनही मोठा निधी तयार होऊ शकतो. आरडी खाते फक्त 100 रुपये जमा करून देखील सुरू करता येते. सध्या RD योजनेवर 5.8% व्याज उपलब्ध आहे. गुंतवणूक रकमेची मर्यादा नाही आरडी खात्यात पैसे जमा करण्यासाठी कमाल मर्यादा नाही. RD तुमच्या सोयीनुसार 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षांसाठी उघडता येते. त्यात जमा केलेल्या पैशावर तिमाही व्याज मिळते. प्रत्येक तिमाहीच्या शेवटी तुमच्या खात्यात चक्रवाढ व्याज जमा केले जाते. पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीममध्ये 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती आपले खाते उघडू शकते. या योजनेत संयुक्त खातेही उघडता येते. अल्पवयीन व्यक्तीचे खाते पालकाच्या वतीने देखील उघडले जाऊ शकते. जर 10 वर्षांपेक्षा जास्त वयाचा अल्पवयीन असेल तर त्याच्या नावावरही खाते उघडता येईल. मोठा निधी उभारणार जर तुम्ही पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये 10 वर्षांसाठी दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर 10 वर्षांनंतर तुम्हाला 5.8% दराने 16 लाखांपेक्षा जास्त रुपये मिळतील. म्हणजेच, जर तुम्ही दरमहा 10000 रुपये ठेवले आणि 5.8 टक्के दराने व्याज मिळाल्यास, तुम्हाला 10 वर्षांच्या मॅच्युरिटीवर 16,28,963 रुपये मिळतील. कर्ज सुविधेचा लाभ पोस्ट ऑफिस आरडीमध्ये कर्जाची सुविधाही उपलब्ध आहे. 12 हप्ते जमा केल्यानंतर कर्ज सुविधा उपलब्ध होईल. खात्यात जमा केलेल्या रकमेच्या 50% पर्यंत कर्ज म्हणून घेतले जाऊ शकते. पण आरडीवरील व्याजापेक्षा 2 टक्के जास्त व्याज कर्जावर भरावे लागेल. आरडीच्या कालावधीपर्यंत कर्जाची परतफेड न केल्यास, कर्ज म्हणून दिलेली रक्कम मुदतपूर्तीच्या रकमेतून वजा केली जाईल.