इतक्या कमी वयात 2500 कोटीच्या कंपनीचा झाला मालक
मुंबई, 8 जुलै- भारतात तरुण उद्योजकांची संख्या वेगानं वाढत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यातले बहुतांश उद्योजक 30 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. काहींनी त्यांच्या स्टार्टअपसाठी नोकरी सोडली, तर काहींनी शिक्षण अर्धवट सोडलं. तरुण उद्योजकांच्या अशा अनेक कथा तुम्ही वाचल्या असतील. अशाच एका नवख्या तरुण उद्योजकाची यशोगाथा पाहू या, ज्याने आपल्या जिद्दीच्या बळावर लहान वयात मोठं यश मिळवलं आहे. मिसबाह अश्रफ असं या उद्योजकाचं नाव आहे. शाळेत दोनदा नापास होऊनही बिहारमधल्या मिसबाह अश्रफने 2463 कोटी रुपयांची फिनटेक कंपनी उभी केली आहे. मूळचा बिहारचा असलेला मिसबाह वारंवार मिळालेल्या अपयशाने खचून गेला नाही. अनेकदा प्रयत्न केल्यानंतर अखेर त्याला यश मिळालं आणि वयाच्या 29व्या वर्षी तो फोर्ब्जच्या ‘फोर्ब्ज 30 अंडर 30’ यादीत समाविष्ट झाला. वाचा- RD चे एक नाही तर आहेत अनेक फायदे! मिळतो FD पेक्षाही जास्त फायदा चार महिन्यांत बंद झाली पहिली कंपनी अश्रफचा जन्म बिहारच्या नालंदा जिल्ह्यात झाला. मध्यमवर्गीय कुटुंबात त्याची जडण-घडण झाली. लहानपणापासून त्याला आयुष्यात काही तरी मोठं करण्याची इच्छा होती. त्यामुळे त्याने लहान वयातच काम करण्यास सुरुवात केली. उच्च शिक्षणासाठी मिसबाहने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला; पण पहिल्या वर्षीच त्याने शिक्षण सोडलं. सप्टेंबर 2013मध्ये आयआयटी दिल्लीतल्या त्याच्या मित्रासोबत त्याने सिबोला (Cibola) हा सोशल पेमेंट उपक्रम सुरू केला; मात्र काही महिन्यांनी ही कंपनी बंद पडली. चार वर्षांनंतर त्यानं ‘मार्सप्ले’ नावाचं आणखी एक स्टार्ट-अप सुरू केलं. त्यामध्ये मिसबाहला प्रचंड यश मिळालं आणि त्यांनी कंपनी आपल्या ताब्यात घेतली; पण कोरोनाच्या काळात कंपनीला खूप फटका बसला. परिणामी त्याला ती कंपनी विकावी लागली. कोरोनाच्या काळातच मिळालं मोठं यश जेव्हा देशात कोरोना महामारीची दुसरी लाट सर्वोच्च पातळीवर पोहोचली होती, तेव्हा मे 2021मध्ये मिसबाहनं ‘जार’ नावाचं तिसरं बिझनेस व्हेंचर सुरू केलं. बचत आणि गुंतवणूक ही या स्टार्टअपची संकल्पना आहे. केवळ 18 महिन्यांत त्याला 11 दशलक्ष युझर्स मिळाले. पुढच्या पाच वर्षांत युझर्सची संख्या 50 दशलक्षपर्यंत वाढवण्याचा कंपनीचा मानस आहे. मिसबाहच्या या फिनटेक फर्मने 58 दशलक्ष डॉलर्सचा निधी उभारला होता.
कॉलेज सोडल्यानंतर मिसबाहनं पल्स.क्यूए (वायसी), परस्यूट, टॉयमेल (वायसी), स्पँगल इत्यादी कंपन्यांमध्ये काम केलं आहे. जार अॅपच्या मदतीनं कमी बचत करूनही सोन्यात गुंतवणूक करता येते. जारचे अॅक्टिव्ह युझर्स देशभरात आहेत. विशेष बाब म्हणजे या स्टार्टअपचे निम्म्याहून अधिक युझर्स टिअर वन शहरातले आहेत. कंपनीचं मुख्य कार्यालय बेंगळुरूत आहे.