मुंबई, 24 ऑगस्ट: काही दिवसांपूर्वीच बेंगळुरूमधील एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली होती. नंदकुमार नावाच्या या व्यक्तीने सुमारे 40 इन्स्टंट लोन देणाऱ्या अॅप्समधून (Loan Apps) कर्ज घेतलं होतं. या कर्जाचा डोंगर मोठा झाल्यामुळे, रिकव्हरी एजंट (Loan Recovery Agents) त्याच्या मागे लागले होते. त्यांच्या त्रासापासून वाचण्यासाठी कुमारने अखेर आपलं आयुष्यच संपवण्याचा निर्णय घेतला. कुमार हे केवळ एक उदाहरण झालं. तुम्ही कुमारची बातमी वाचली नसेल, तरी अशा प्रकारच्या दुसऱ्या एखाद्या व्यक्तीची बातमी नक्की वाचली असणार. कारण, अशा प्रकारे लोन रिकव्हरी एजंटच्या त्रासाला (Harassment by Loan Recovery Agents) कंटाळून आत्महत्या करणारा कुमार एकटाच नाही. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) आकडेवारीनुसार, कोरोना महामारीनंतर आत्महत्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यांपैकी सुमारे 25,200 आत्महत्या या नोकरी गेल्यामुळे किंवा कर्जबाजारीपणामुळे झाल्या होत्या. अशा प्रकरणांमध्ये आपल्याला एकसारखा पॅटर्न पहायला मिळतो. लोन अॅप्स (Loan Apps) सुरूवातीला कागदपत्रांशिवाय कर्ज देण्याचं आमिष दाखवतात. यासाठी व्याजदरही मोठा आकारण्यात येतो. हे कर्ज तुम्ही वेळेत परत केलं, तर ठीक. अन्यथा, तुम्ही जर नुकतीच नोकरी गमावली असेल, किंवा व्याजाची रक्कम वाढत चालली असेल तर ईएमआयचा (Loan EMI) डोंगर तुमच्या डोक्यावर येतो. यानंतर रिकव्हरी करणारे लोन शार्क्स (Loan Sharks) तुमची पब्लिकली उपलब्ध असलेली माहिती वापरून तुम्हाला धमकी देऊ लागतात. यामध्ये मग तुमचे फेसबुकवरील फोटो घेऊन त्यांना अश्लीलरित्या मॉर्फ (Loan sharks morf photos) करून ते व्हायरल करण्याची धमकी देणं, किंवा तुमच्या ओळखीतील लोकांना किंवा कुटुंबीयांना फोन करून धमकी देणं असे प्रकार सुरू होतात. कित्येक लोक याबाबत काहीही करू शकत नाहीत, कारण कर्ज घेतलं होतं हे तर ते नाकारू शकत नाहीत. आरबीआयने नुकतंच डिजिटल मनी लेंडिंगवर (Digital Money Lending) कार्यरत गटाच्या शिफारसी प्रसिद्ध केल्या आहेत, ज्यामध्ये ग्राहक संरक्षण आणि आचरण समस्यांबद्दल मार्गदर्शक तत्वं देण्यात आली आहेत. त्यामुळे नियामक हे कर्जांच्या सापळ्यांवर आणि अशा सावकारांच्या गैरव्यवहारावर लक्ष ठेऊन आहेत. लोन अॅप्स घेतायत खबरदारी पेयू फायनान्सचे (PayU Finance) सीओओ मयुरेश किणी यांनी त्यांच्या बाजूने घेण्यात येणाऱ्या खबरदारीबाबत माहिती दिली. “आम्ही ग्राहकांची पार्श्वभूमी तपासून त्यांच्या खर्चाची मर्यादा पाहतो, जेणेकरुन ते अति प्रमाणात कर्ज घेत नाहीत याची खात्री व्हावी. ग्राहकाने घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याची क्षमता त्याच्यात आहे याची खात्री करून घेतो. आम्ही विवेकपूर्ण कर्ज देण्यावर विश्वास ठेवतो. नवीन मार्गदर्शक तत्वं लागू केल्यामुळे नियमन केलेले किंवा खासगी कर्ज सेवा प्रदातेदेखील नियमावलीच्या कक्षेत आले आहेत,” असं त्यांनी स्पष्ट केलं. तुम्ही खबरदारी घेणं गरजेचं फिनटेक कर्ज देणारे प्लॅटफॉर्म (Fintech Lending Platforms) हे खबरदारी बाळगत असले, तरी तुमची जबाबदारी कमी होत नाही. कर्ज घेण्याच्या बाबतीत तुम्हीदेखील खबरदारी घेणं गरजेचं आहे. अन्यथा कर्जाचा आकडा हा मृत्यूचा सापळा बनण्यास वेळ लागत नाही. यासाठी तुम्ही कर्ज कशासाठी घेत आहात याचा विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या गरजांसाठी कर्ज घेत असाल तर ते चुकीचं नाही, मात्र तुम्ही केवळ चैन करण्यासाठी कर्ज घेत असाल तर मात्र तुम्हाला सावध होणं गरजेचं आहे. कारण, कर्जाच्या पैशांवर जगत असताना एक वेळ अशी येते, जिथे तुम्हाला पुढचं कर्ज मिळत नाही. त्यामुळे मागचं कर्ज फेडणं अवघड होऊन बसतं, आणि ती साखळी वाढत जाते. त्यामुळे तुम्ही कर्ज कशासाठी घेत आहात याचा विचार करणं गरजेचं आहे. घर किंवा शिक्षणासाठी कर्ज घेणं योग्य घर खरेदी करण्यासाठी किंवा शिक्षणासाठी जर तुम्ही कर्ज (What is Good Loan) घेत असाल तर ते योग्य असल्याचे कित्येक तज्ज्ञांचे मत आहे. याला कारण म्हणजे, घराची किंमत ही काही वर्षांनी आतापेक्षा जास्त असू शकते. म्हणजेच जोपर्यंत तुम्ही कर्जाचे हप्ता भरत आहात, त्या सर्व वर्षांमध्ये तुमच्या घराची किंमतही वाढत आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही शेवटचा हप्ता भरून घराचे मालक होता, तेव्हा त्या घराची किंमत मधल्या काळात वाढलेली असते. म्हणजेच एका अर्थाने तुम्ही गृहकर्ज घेऊन खर्च नाही, तर गुंतवणूक करत आहात. हीच गोष्ट शैक्षणिक कर्जालाही लागू होते. कित्येक विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेण्यासाठी किंवा परदेशात शिक्षण घेण्यासाठी भरपूर पैशांची गरज असते. अशा वेळी कर्ज काढणे ही चुकीची गोष्ट नाही. कारण, तुम्ही शिक्षणासाठी जेव्हा कर्ज घेता तेव्हा तुम्हाला पुढे चांगल्या पगाराची नोकरी मिळणे अपेक्षित असते. ही नोकरी मिळवल्यानंतर तुम्ही पुढील काही वर्षांमध्येच कर्ज फेडून मोकळे होऊ शकता. त्यामुळे तीदेखील एक प्रकारची गुंतवणूकच ठरते. जी गोष्ट नोकरीची, तीच व्यवसायाचीही. तुमच्याकडे चांगली संकल्पना असेल, आणि बिझनेस करण्याची तयारी असेल, तर व्यवसायासाठी कर्ज घेणेही वाईट गोष्ट नाही. एकूणच, जी गोष्ट तुम्हाला पुढे पैसे कमावण्यासाठी उपयोगी ठरेल, किंवा ज्या गोष्टीचे मूल्य नंतर वाढेल अशा गोष्टींसाठी कर्ज घेणे हा चांगला निर्णय ठरू शकतो. मात्र तेच जर तुम्ही गाडी किंवा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी कर्ज घेत असाल, तर मात्र तो चुकीचा निर्णय आहे. कारण, ज्या काळात तुम्ही कर्जाचे हप्ता भराल, त्यादरम्यान त्या गाडीची किंवा फोनची किंमत ही कमी होत जाते. त्यामुळे जेव्हा तुम्ही शेवटचा हप्ता भरून त्या वस्तूचे मालक होता; तिची किंमत पहिल्यापेक्षा कितीतरी पटींनी कमी झालेली असते. यामुळेच तज्ज्ञ हे अशा गोष्टींसाठी कर्ज घेण्याचा सल्ला देतात; ज्या तुमचा खर्च नव्हे, तर गुंतवणूक ठरतील. अर्थात, घरासाठी देखील कर्ज घेताना तुम्ही ते किती प्रमाणात घेत आहात हेदेखील महत्त्वाचं ठरतं. कर्ज घेताना पाळा या टिप्स सृजन फायनान्शिअल सर्व्हिसेस LLP च्या संस्थापक दीपाली सेन यांनी सांगितलं, की गृहकर्ज घेणं योग्य असलं तरी ऐपतीच्या बाहेरचं कर्ज हा तुमच्यासाठी सापळा ठरू शकतो. जर तुम्ही मोठी रजा घेतली, लवकर निवृत्त झाला, किंवा तुमची नोकरीच गेली तर अशा परिस्थितींमध्ये तुम्ही ईएमआय भरण्यास असमर्थ ठरता. त्यामुळे हळूहळू कर्जाचा डोंगर उभा राहतो, असं त्या म्हणाल्या. त्यामुळे कर्ज घेताना या टिप्स (Loan taking Tips) लक्षात ठेवणं गरजेचं आहे : 1. तुमचं गृहकर्ज हे तुमच्या घराच्या किंमतीपेक्षा 50 टक्क्यांहून अधिक नसावं. 2. तुमच्या कर्जाचा ईएमआय हा तुमच्या मासिक उत्पन्नाच्या 40 टक्क्यांपेक्षा कमीच असावा. 3. कार लोन घेतलं असेल, तर ईएमआय हा तुमच्या मासिक उत्पन्नाच्या पाच टक्केच असावा. 4. जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर तुमचा त्यावरील मासिक खर्च हा क्रेडिट लिमिटपेक्षा 10 ते 12 टक्केच असावा. तसंच, दर महिन्याच्या ड्यू-डेटपूर्वीच तुम्ही सर्व रक्कम परत भरावी. 5. शिक्षणासाठी कर्ज घेतल्यानंतर जर तुम्हाला चांगली नोकरी नाही मिळाली, तर घेतलेले कर्ज फेडणेही अवघड होते. त्यामुळे तो शेवटचा पर्याय ठेवा. 6. झीरो इंट्रेस्ट लोन घेत असताना तुमच्या मासिक उत्पन्नाच्या 10 टक्क्यांहून अधिक रक्कम ईएमआयमध्ये जाणार नाही याची खबरदारी घ्या. 7. बिझनेस लोन आणि वैयक्तिक गोष्टीसाठी घेतलेले लोन यामध्ये गोंधळ करू नका. मोहाला बळी पडू नका गेनिंग ग्राऊंड इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेसच्या को-फाउंडर क्षितिजा शेटे म्हणतात, की लोन अॅप्सच्या माध्यमातून कर्ज घेणं हे सध्या सर्वांत सोयीचं ठरत आहे. झीरो इंट्रेस्ट ईएमआय, कमी कागदपत्रं यांच्या मोहापासून दूर पळणं (Avoid no cost EMI trap) हे केवळ अशक्य होऊन बसतं. तुमचा कॅश फ्लो, म्हणजेच इन्कम विरुद्ध कमिटमेंट याबाबत तुम्ही जागरूक असावं, असं मत क्षितिजा शेटे यांनी व्यक्त केलं. गुंतवणुकीबाबत किंवा खर्च नियंत्रित ठेवण्याबाबतची जाणीव ही कॅशफ्लो नियोजनातून येते, हे आम्ही पाहिलं असल्याचे त्या म्हणाल्या. दीपाली सेनदेखील या गोष्टीला दुजोरा देतात. कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही हे लक्षात घेणं गरजेचं असल्याचं त्या म्हणतात. त्यामुळे ‘पे-लेटर’ किंवा तत्सम स्कीम या आपल्याला तात्पुरत्या चांगल्या वाटत असल्या, तरी त्या आपल्याला कर्ज काढून जगण्याच्या व्यवस्थेत खेचत असल्याचे सेन म्हणतात. आपल्या कमाईनुसार खर्चावर नियंत्रण ठेवणे ही अवघड गोष्ट आहे. मात्र, कमाईपेक्षा अधिक खर्च करण्याची एकदा सवय लागली की सोडणे आणखी अवघड आहे. त्यामुळेच आपल्या आर्थिक मर्यादेत राहणे, आणि केवळ गुंतवणूक ठरेल, किंवा मिळकत निर्माण करून देईल अशा गोष्टींसाठी कर्ज घेणे या गोष्टींचे पालन करणे आवश्यक ठरते. तसं केलं नाहीत तर नव्या गोष्टी खरेदी करण्याचा मोह होणार आणि तुम्ही कर्ज घेणार त्याऐवजी मिळकतीच्या तुलनेत खर्च ठेवला तर तुम्ही कर्जाला मृत्यूचा सापळा बनण्यापासून रोखू शकता.