नवी दिल्ली, 2 एप्रिल : देशभरात महागाई सतत (Inflation) वाढतेच आहे. पेट्रोल-डिझेल, एलपीजी गॅस, दूध अशा अनेक दररोज वापरायच्या वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे. अशात सर्वसामान्यांना आता पुन्हा एकदा फटका बसणार आहे. आता दररोजच्या खाण्या-पिण्याच्या वस्तूंमध्ये वाढ झाली आहे. साबण, बिस्किट, कॉफी, डिटर्जेंट पावडर अशा दररोज लागणाऱ्या वस्तूंचे दर वाढले आहेत. साबण - डिटर्जेंट पावडर - साबण, डिटर्जंट पावडचे दर वाढले आहेत. देशातील सर्वात मोठी FMCG कंपनी हिंदुस्तान यूविलिव्हर लिमिटेडने (Hindustan Unilever Limited) आपल्या वस्तूंचे दर वाढवले आहेत. साबण आणि डिटर्जेंटचे दर 3 ते 4 टक्क्यांनी वाढवले आहेत. हिंदुस्तान यूविलिव्हरने मागील 6 महिन्यात आपल्या वस्तूंच्या किमतीत 30 ते 40 टक्क्यांची वाढ केली आहे.
ब्रिटानिया बिस्किटाच्या दरात वाढ - एका रिपोर्टनुसार, भारतातील सर्वात मोठी बिस्किट कंपनी ब्रिटानिया (Britannia) यावर्षी आपल्या बिस्किटांच्या किमतीत 7 टक्क्यांची वाढ करू शकते. या महिन्याच्या सुरुवातीला एचयूएलनं ब्रू कॉफी पावडरच्या (Bru Coffee Powder) किमती 3 ते 7 टक्क्यांनी वाढवल्या होत्या. ब्रू गोल्ड कॉफी जार तीन-चार टक्क्यांनी आणि ब्रू इन्स्टंट कॉफी पाऊच 3 ते 6.66 टक्क्यांनी महागले आहेत. त्याचबरोबर ताजमहाल चहाची किंमतही 3.7 वरून 5.8 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. ब्रुक बाँडच्या विविध प्रकारांच्या किमती 1.5 ते 14 टक्क्यांनी वाढवण्यात आल्या आहेत. याशिवाय टूथपेस्ट, क्रीमसारख्या वस्तूही महाग झाल्या आहेत. खाण्या-पिण्याच्या गोष्टींमध्ये चहा, कॉफीसह दूध, मॅगी, डाळ, तूप, ग्लूकोज पावडर, तांदूळ, गव्हाचं पीठ, मसाले, नमकीन अशा गोष्टींचे दर वाढले आहेत.
का वाढतेय महागाई? रशिया-युक्रेन युद्धानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत आहेत. इंधन दर वाढल्यामुळे माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं महाग पडतं आहे. याचा परिणाम दैनंदिन वस्तूंच्या किमतीवर होत आहे. तसंच या वस्तू बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीतही सातत्याने वाढ होत असल्याने महागाई दिवसेंदिवस वाढतेच आहे.