आयटीआर
मुंबई : सध्याचे दिवस इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे आहेत. 31 जुलै ही त्यासाठीची अंतिम तारीख आहे. त्यामुळे मुदतीत हे काम पूर्ण करण्यासाठी अनेकांची धावपळ सुरू आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 24 जुलै रोजी एका कार्यक्रमात अशी माहिती दिली, की देशभरातल्या एक लाख करदात्यांना इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून नोटीस बजावण्यात आली आहे. ITR अर्थात इन्कम टॅक्स रिटर्न न भरण्यापासून चुकीची माहिती देण्यापर्यंतच्या अनेक कारणांमुळे या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. त्या संदर्भात अधिक माहिती घेऊ या. आयटीआर फॉर्ममध्ये एखाद्या करदात्याने चुकीची माहिती दिली, तर इन्कम टॅक्स विभाग त्या करदात्याला वेगवेगळ्या कायद्यांनुसार नोटिसा पाठवू शकतो. आपलं सर्व प्रकारचं उत्पन्न आणि बचत/गुंतवणूक यांची नेमकी माहिती देणं गरजेचं असतं. त्यासाठी इन्कम टॅक्स विभाग वेळोवेळी आवाहन करत असतो. आयटीआरची स्क्रुटिनी अर्थात छाननी करण्याच्या दोन प्रक्रिया असतात. एक असते मॅन्युअल आणि दुसरी कंपल्सरी. त्यातून चुकीची माहिती उघड होऊ शकते. त्यामुळे आयटीआर फाइल करताना कोणती सावधगिरी बाळगली तर चुका होणार नाहीत, याबद्दल जाणून घेऊ या.
- आयटीआर दाखल न करणं : टॅक्स स्लॅबमध्ये येणाऱ्या अर्थात करपात्र उत्पन्न असलेल्या व्यक्तीला आयटीआर फाइल करणं अनिवार्य आहे. अन्यथा आयकर विभाग नोटीस पाठवू शकतो. परदेशात काही संपत्ती मालकीची असलेल्या भारतीय व्यक्तीलाही आयटीआर फाइल करणं बंधनकारक असतं. - डेडलाइनची वाट पाहू नका : आयटीआर फाइल करताना चुका न होणं तर आवश्यक असतंच; पण त्यासाठी तो वेळेवर फाइल करणं गरजेचं आहे. फायलिंगसाठी अंतिम मुदतीची वाट पाहू नये. शक्य तितक्या लवकर हे काम करून टाकावं. कारण ऐन वेळी घाईघाईत फाइल करताना चुका होण्याचा धोका वाढतो. - महत्त्वाचे तपशील : अनेक जण आयटीआर फाइल करताना महत्त्वाचे तपशील भरतच नाहीत. त्यामुळे नोटीस मिळू शकते. आपल्याला ते समजत नसेल, तर सीएकडूनच रिटर्न भरून घ्यावा. - टीडीएस : उद्गम करकपात अर्थात टीडीएसची रक्कम आयटीआर फॉर्ममध्ये भरताना काळजी घेतली पाहिजे. कापला गेलेला टीडीएस आणि आपण आयटीआर फॉर्ममध्ये भरलेला टीडीएस यांमध्ये फरक असेल, तर नोटीस येऊ शकते. त्यामुळे नेमका किती टीडीएस कापला गेला आहे, याची माहिती घेऊनच ती रक्कम लिहावी. - अघोषित उत्पन्न : वर्षभरात आपण किती उत्पन्न मिळवलं याची माहिती आयटीआर फॉर्ममध्ये भरायची असते. गुंतवणुकीची माहितीही द्यायची असते. गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती दडवल्यास नोटीस येऊ शकते. त्यामुळे बँकांकडून इंटरेस्ट स्टेटमेंट घेऊन त्याची माहिती आयटीआरमध्ये भरावी. आणखी कोणत्या स्रोतातून उत्पन्न असेल, तर त्याची माहितीही भरावी. एक गोष्ट लक्षात घ्यावी, की नोटीस आली की प्रत्येक वेळी त्याचा अर्थ काही तरी चूक झाली आहे असा होत नाही. काही वेळा नियमित चौकशी किंवा एखाद्या आर्थिक व्यवहाराबद्दल स्पष्टीकरण अशा कारणासाठीही नोटीस पाठवली जाऊ शकते. फॉर्ममध्ये दिलेल्या उत्पन्नाची तपासणी करण्याच्या हेतूनेही नोटीस पाठवली जाते. ‘डेलॉइट हास्किन्स अँड सेल एलएलपी’चे तरुण गर्ग यांनी सांगितलं, की ‘काही वेळा एखाद्याकडे व्याजातून मिळालेल्या उत्पन्नाचे तपशील मागण्यासाठी नोटीस बजावली जाऊ शकते किंवा मालमत्तेच्या विक्रीवर दावा करण्यात आलेल्या नुकसानाच्या संदर्भातही नोटीस पाठवली जाऊ शकते. व्याजातून उत्पन्नाच्या बाबतीत नोटीस असेल, तर बँकेकडून इंटरेस्ट सर्टिफिकेट घेऊन ते सादर केलं जाऊ शकतं. मालमत्तेतून नुकसानासंदर्भात नोटीस असेल, तर खरेदी मूल्य, विक्री मूल्य आदींचे पुरावे मागितले जाऊ शकतात.’ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोटीस आल्यावर घाबरून जाण्याचं काही कारण नाही. कदाचित कारण भीती वाटण्यासारखं असूही शकतं; पण ते नेमकं काय आहे, हे आधी समजून घेतलं पाहिजे. सध्या पोर्टलच्या माध्यमातून आयटीआर फायलिंग केलं जात असल्याने नोटिसा आणि त्यांना दिलेली उत्तरं यांचं ट्रॅकिंग करणं सोपं आहे. मिळालेली नोटीस खरी असल्याची खात्री आधी करावी. कदाचित काही वेळा गुप्त आर्थिक माहिती मिळवण्यासाठी कोणी तरी फसवणुकीच्या दृष्टीनेही असा प्रकार केलेला असू शकतो. ‘टॅक्सनोड्स’चे संस्थापक सीईओ अविनाश शेखर सांगतात, की आयकर विभागाकडून आलेल्या नोटीसमध्ये PAN, DIN यांसह अन्य महत्त्वाची माहिती दिलेली असते. त्यावरून नोटिशीची सत्यता पडताळता येऊ शकते. अधिक माहितीसाठी आयकर विभागाच्या वेबसाइटला भेट द्यावी. नोटीस वैध असल्याची खात्री पटल्यानंतर त्यात दिलेली माहिती बारकाईने वाचावी आणि समजून घ्यावी. कमी दाखवलेलं उत्पन्न, करात विसंगती, काही आर्थिक व्यवहारांचा तपशील न देणं अशा काही कारणांशी संबंधित नोटीस असू शकते. त्या नोटिशीला योग्य त्या पुराव्यासह उत्तर द्यावं आणि नोटीसमध्ये दिलेल्या माहितीनुसार कार्यवाही करावी.