JOIN US
मराठी बातम्या / मनी / ITR for Minors: मुलांच्या उत्पन्नावरही आयकर लागतो का? वाचा काय आहेत नियम

ITR for Minors: मुलांच्या उत्पन्नावरही आयकर लागतो का? वाचा काय आहेत नियम

ITR for Minors: 18 वर्षांवरील प्रत्येकाला त्यांच्या उत्पन्नावर आयकर भरावा लागतो, हे सर्वांना माहीत आहे. पण मुलांच्या उत्पन्नावर कोणतं कर नियम लागू आहेत? चला जाणून घेऊया.

जाहिरात

ITR for Minors: मुलांच्या उत्पन्नावरही आयकर लागतो का? वाचा काय आहेत नियम

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 ऑगस्ट: प्रौढांना म्हणजे 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना त्यांच्या उत्पन्नावर आयकर स्लॅबनुसार आयकर (Income Tax) भरावा लागतो, हे सर्वांना माहीत आहे. पण अल्पवयीन मुलांच्या उत्पन्नावर कोणते कर नियम (ITR for Minors) लागू आहेत? त्यांनाही उत्पन्नावर आयकर भरणं आवश्यक आहे का? तुम्ही म्हणाल की लहान मुलांना कर भरण्याची जबाबदारी आणि त्यासंबंधीच्या तरतुदी कशा समजतील? आणि जेव्हा तुम्ही समजू शकत नाही, तेव्हा तुम्ही त्यांचं पालन कसं कराल? अल्पवयीन मुलांच्या उत्पन्नाशी संबंधित कर नियम काय आहेत ते आज जाणून घेऊया. अल्पवयीन व्यक्तीच्या उत्पन्नाचा अर्थ काय आहे? अल्पवयीन मुलानं मिळवलेलं कोणतंही उत्पन्न दोन प्रकारचे असू शकते, अर्जित म्हणजे स्वत: कमावलेलं उत्पन्न आणि अनर्जित म्हणजे असं उत्पन्न जे मुलानं स्वतः कमावलेलं नाही. एखादी स्पर्धा किंवा रिअॅलिटी शो जिंकणं, व्यवसायात भाग घेणं किंवा अर्धवेळ नोकरी करणं या बदल्यात मुलाला कोणतीही रक्कम मिळाली तर ती त्याची कमाई मानली जाईल. परंतु जर त्याला कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडून भेट म्हणून कोणतीही रक्कम मिळाली तर ती अनर्जित मिळकत मानली जाईल. मुलाच्या नावानं पालकांनी उघडलेली बँक खाती किंवा गुंतवणुकीवर मिळणारं व्याजही या वर्गात टाकलं जाईल. उत्पन्नावर काय कर लागेल? प्राप्तिकर कायद्याच्या कलम 64 (1A) नुसार, 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलानं प्राप्त केलेली कोणतीही रक्कम त्याच्या पालकांच्या उत्पन्नात जोडली जाईल आणि नंतर त्याला पालकांना लागू असलेल्या दरानं आयकर भरावा लागेल. जर पालक दोघेही कमावत असतील, तर ज्या पालकांचं उत्पन्न जास्त असेल त्यांच्या उत्पन्नात मुलाचं उत्पन्न जोडले जाईल. एका मुलाच्या वार्षिक 1500 रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर देखील कर सूट उपलब्ध आहे, परंतु ही सूट फक्त दोन मुलांसाठी लागू आहे. पालकांना त्यांच्या स्वतःच्या करावर तसेच अल्पवयीन मुलाच्या उत्पन्नावर कर भरावा लागेल. मुलाचं उत्पन्न पालकांच्या उत्पन्नात जोडण्याचा हा नियम दत्तक घेतलेल्या किंवा सावत्र मुलांच्या बाबतीतही लागू आहे. या तरतुदीला अपवाद आहेत का? जर अल्पवयीन मूल अनाथ असेल, म्हणजेच त्याचे आई-वडील दोघेही या जगात नाहीत, तर त्याचं उत्पन्न पालकांना जोडलं जाणार नाही. अशा परिस्थितीत त्याच्या उत्पन्नावर स्वतंत्रपणे कर भरावा लागेल आणि विवरणपत्रही स्वतंत्रपणे भरावं लागेल. जरी एखादं मूल कलम 80U मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही अपंगत्वानं ग्रस्त असले तरी, त्याचं उत्पन्न पालकांच्या उत्पन्नात जोडलं जाणार नाही. अपंगत्व 40 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यासच ही सूट मिळेल. जर पालकांचा घटस्फोट झाला असेल, तर मुलाचं उत्पन्न ज्या पालकांकडे मुलाचा ताबा असेल त्यांच्या उत्पन्नात जोडलं जाईल. हेही वाचा-  Aadhar Card: पेन्शनधारकांना आधार कार्डवरून मिळतात ‘या’ 3 खास सुविधा, बँकेत जाण्याची नाही गरज मुलाचे रिटर्न कोण भरणार? आयकर रिटर्न भरण्यासाठी वयोमर्यादा नाही. त्यामुळं ज्या मुलांचं उत्पन्न त्यांच्या पालकांच्या उत्पन्नात जोडलेलं नाही, त्यांचं विवरणपत्र त्यांच्या स्वत:च्या नावावर भरलं जाईल. पालकही हे रिटर्न मुलाच्या नावानं दाखल करू शकतात. जर पालक किंवा मुलाचं उत्पन्न व्यवस्थापित करणारी कोणतीही व्यक्ती रिटर्न भरत असेल, तर त्याला/तिला त्याची ओळख सिद्ध करणारी कागदपत्रे आयकर विभागाच्या वेबसाइटवर अपलोड करावी लागतील. यानंतर, ती व्यक्ती प्रतिनिधी निर्धारक म्हणून अल्पवयीन व्यक्तीचं कर विवरणपत्र भरू शकेल. मुलांच्या पॅन कार्डचा काय नियम आहे? अल्पवयीन मुलं देखील त्यांचं पॅन कार्ड ठेवू शकतात. पालक त्यांचे पॅन कार्ड बनवण्यासाठी अर्ज करू शकतात. वास्तविक, जर अल्पवयीन व्यक्तीचे रिटर्न स्वतंत्रपणे भरायचे असतील, तर पॅनकार्डसोबत त्याच्या बँक खात्याचे तपशील, उत्पन्नाचे तपशील, मोबाइल फोन नंबर आणि ईमेल खाते यासारखे तपशील देखील आवश्यक असतील. त्यानंतरच आयकर पोर्टलवर त्यांचे लॉगिन आणि पासवर्ड तयार करून रिटर्न भरता येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या