नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर : नोकरी करणारी प्रत्येक व्यक्ती महिन्याच्या सुरुवातीला बँक अकाउंटमध्ये सॅलरी म्हणजेच पगार जमा होण्याची आतुरतेनं वाट बघत असते. मात्र, ही सॅलरी किती दिवस अकाउंटमध्ये शिल्लक राहते? विविध प्रकारची बिलं, लोनचे हप्ते भरल्यानंतर सॅलरी जमा झाल्यापासून 10 ते 15 दिवसांतच बहुतेकांचं अकाउंट पुन्हा रिकामं होतं. त्यांना बचत करण्याची संधीही मिळत नाही. अनेकांना असं वाटतं की पगार वाढला तर बचत करता येईल, म्हणून ते पगारवाढीची वाट बघत बसतात. मात्र, असं काहीही होत नाही. कारण, पगार वाढला की आपले खर्चही आपोआप वाढतात. मात्र, जर आपण निश्चय आणि योग्य नियोजन केल्यास आहे त्या पगारातूनही बचत करू शकतो. त्यासाठी काही टिप्स लक्षात देणं गरजेचं आहे. ‘आज तक’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. कमी पगारातूनही करता येते बचत - तुमचा पगार दरमहा 20 हजार रुपये असेल तरीही तुम्ही त्यातून चांगली बचत करू शकता. बँक अकाउंटमध्ये पगार जमा होताच, बचतीसाठी निश्चित केलेली रक्कम दुसर्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून ठेवा. जर, दुसरं अकाउंट नसेल तर बचतीसाठी निश्चित केलेल्या रकमेतील एकही रुपया खर्च होणार नाही, याची काळजी घ्या. जर तुम्हाला बचत करणं कठीण वाटत असेल तर सुरुवातीला तुमच्या पगारातील फक्त 10 टक्के रक्कम बाजूला ठेवा. यानुसार पहिल्या सहा महिन्यांसाठी तुम्ही दरमहा दोन हजार रुपयांची बचत करू शकता. 50 हजार रुपये पगार असल्यास बचत कशी करावी? - आजकाल अनेक जणांना दरमहा 50 हजार रुपयांपर्यंत सॅलरी मिळते. जर तुमचा पगारही 50 हजार रुपये असेल, तर तुम्ही दरमहा नक्कीच बचत केली पाहिजे. तुम्ही विवाहित असाल आणि तुम्हाला दोन मुलं असतील. तरीही तुम्ही तुमच्या 50 हजार रुपये पगारातून बचत करू शकता. पगारदार लोकांनी, विशेषत: खासगी नोकरी करणाऱ्यांनी दरमहा त्यांच्या पगारातील सुमारे 30 टक्के बचत केली पाहिजे. म्हणजे 50 हजार रुपये पगार असेल तर दरमहा 15 हजार रुपये वाचले पाहिजेत. जर तुम्ही दर महिन्याला 15 हजार रुपये वाचवू शकत नसाल, तर तुम्ही कधीच गुंतवणुकीचं उद्दिष्ट गाठू शकणार नाही. जर तुम्ही बचत करायला सुरुवात करत असाल, तर काही महिने पगारातील फक्त 10 टक्के रक्कम बाजूला ठेवा. साधारण सहा महिन्यांनंतर बचतीचा आकडा 30 टक्क्यांपर्यंत वाढवा. बचत सुरू केल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागेल. पूर्ण पगार खर्च करण्याची सवय असल्यामुळे खर्च भागणार नाही. पण, बचतीची सवय लागल्यानंतर सहा महिन्यांतच तुमच्या या अडचणी दूर होतील. खर्चाचं नियोजन करण्यासाठी अगोदर सर्व खर्चाची यादी तयार करा. त्यामध्ये जास्त आवश्यक असलेल्या गोष्टींना प्राधान्य द्या. फार गरजेच्या नसलेल्या गोष्टींसाठी खर्च करू नका. हेही वाचा - पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्डसाठीच फोन का येतो? या सर्व्हेमधून समोर आलं उत्तर
जर तुम्हाला महिन्यातून चार वेळा बाहेर खाण्याची सवय असेल तर महिन्यातून दोनच वेळा बाहेर जा. याशिवाय अनावश्यक खर्चांची यादी करून ते टाळले पाहिजेत. प्रत्येक व्यक्ती आपल्या पगारातील 10 टक्के रक्कम अनावश्यक गोष्टींवर खर्च करते. याशिवाय, क्रेडिट कार्डचा वापर आणि ऑनलाइन शॉपिंग टाळा. जेव्हा तुम्ही खरेदीसाठी बाहेर जाल तेव्हा घराबाहेर पडण्यापूर्वी यादी तयार करा. ऑफरला बळी पडून अनावश्यक खरेदी टाळा. असं केल्याने तुम्ही दरमहा तुमच्या पगारातील 30 टक्के रक्कम सहज वाचवू शकता.
बचत केलेली रक्कम योग्य ठिकाणी गुंतवा - अशाप्रकारे बचत केल्यास 50 हजार रुपये पगार असलेली व्यक्ती एका वर्षात1.80 लाख रुपये वाचवू शकते. तुम्ही दरमहा 15 हजार रुपयांची बचत केली तर त्यातील पाच हजार रुपये आपत्कालीन निधी म्हणून ठेवा. म्युच्युअल फंडातील एसआयपीमध्ये दरमहा पाच हजार रुपये भरता येतील. उरलेले पाच हजार रुपये रिकरिंग डिपॉझिटमध्ये किंवा गोल्ड बाँडमध्ये गुंतवता येतील. जेव्हा जेव्हा तुमचा पगार वाढेल तेव्हा त्यानुसार गुंतवणुकीची रक्कम वाढवत राहा. जर तुम्ही 10 वर्षे या फॉर्म्युल्यासह बचत आणि गुंतवणूक करत राहिल्यास भविष्यात तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही.