मुंबई, 13 सप्टेंबर : गेल्या काही वर्षांत सर्वच शासकीय विभाग ऑनलाइन (Online) करण्यावर सरकारने भर दिला आहे. शासकीय योजनांमध्ये (Government Schemes) पारदर्शकता राहावी, नागरिकांना योजनांचा लाभ घेता यावा आणि महत्त्वाची कागदपत्रं तातडीनं उपलब्ध व्हावीत हे यामागचे उद्देश आहेत. शासकीय विभागाचं काम ऑनलाइन होत असताना सरकारने नागरिकांच्या सुविधेसाठी निरनिराळी अॅप्स (Apps) उपलब्ध करून दिली आहेत. पूर्वी कोणतंही शासकीय काम पूर्ण होण्यास मोठा कालावधी लागायचा; मात्र डिजिटलायझेशनमुळे स्थिती बदलली आहे. आता नागरिक स्मार्टफोनवर निरनिराळी अॅप्स डाउनलोड करून घरबसल्या शासकीय कामं पूर्ण करू शकतात किंवा योजनांचा लाभ घेऊ शकतात. MyGov, m-Parivahan आणि m-Passport Seva सेवा यांसारखी काही महत्त्वाची अॅप्स तर मोबाइलमध्ये असणं आवश्यक आहे. या अॅप्समुळे अनेक कामं सहज पूर्ण होऊ शकतात. `एबीपी लाइव्ह`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. अगदी अलीकडेपर्यंत कोणत्याही स्वरूपाचं शासकीय काम असेल किंवा योजनांची माहिती, लाभ घ्यायचा असेल, तर संबंधित विभागाच्या कार्यालयात वारंवार जावं लागे. कोणतंही काम पूर्ण होण्यास अनेक कारणांमुळे बराच कालावधी लागे. त्यामुळे नागरिक मेटाकुटीला येत; पण आता डिजिटलायझेशनमुळे ही कामं सोपी झाली आहेत. स्मार्टफोनवर (Smartphone) संबंधित विभागाचं अॅप डाउनलोड करून तुम्ही घरबसल्या योजनांची माहिती घेणं, कामं पूर्ण करणं, योजनांचा लाभ घेणं आदी गोष्टी करू शकता. भारतात पासपोर्ट (Passport) काढणं आणि पासपोर्टशी संबंधित सेवांचा लाभ घेण्यासाठी एम-पासपोर्ट सेवा (mPassport Seva) या अॅपचा वापर केला जात आहे. हे अॅप नागरिकांसाठी खूप उपयुक्त आहे. या अॅपच्या मदतीनं अनेक शासकीय कामं करता येतात. तसंच विविध गोष्टींची माहिती घेता येते. विविध कामांसह या अॅपच्या माध्यमातून पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्जदेखील करता येतो. MyGov App 2014 मध्ये सुरू झालं. या अॅपच्या माध्यमातून नागरिक सरकारशी थेट जोडले जाऊ शकतात. या अॅपच्या माध्यमातून नागरिक विविध शासकीय योजनांची माहिती घेऊ शकतात. तसंच शासकीय कामं करू शकतात. याशिवाय एखाद्या योजनेच्या अनुषंगानं नागरिक आपलं मत सरकारपर्यंत पोहोचवू शकतात. हे अॅप खूप लोकप्रिय असून, नागरिकांसाठी उपयुक्त ठरत आहे. एम-परिवहन अॅपद्वारे (mParivahan app) नागरिक रोड ट्रान्सपोर्ट आणि व्हेइकल डिपार्टमेंट अर्थात वाहन विभागाशी संबंधित कामं सहजपणे पूर्ण करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून गाडी नोंदणी मुदत, ड्रायव्हिंग लायसन्स काढणं, व्हेइकल क्लास, रजिस्ट्रेशन ऑथोरिटी, व्हेइकल एज, फिटनेस व्हॅलिडिटी, इन्शुरन्स व्हॅलिडिटी आदी कामं पूर्ण करता येतात. एकूणच ही तिन्ही अॅप्स नागरिकांसाठी खूपच उपयुक्त आहेत. यामुळे शासकीय कामं करणं सुलभ झालं आहे.