नवी दिल्ली, 26 मार्च : कोरोना व्हायरस पँडेमिक (Corornavirus Pandemic) जवळपास 190 देशांच्या आर्थिक व्यवस्थेला फटका बसला आहे. विविध देशांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. यावेळी सामान्यांना दिलासा देणाऱ्या काही महत्त्वाच्या घोषणा अर्थमंत्र्यांकडून करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गोरगरिब आणि कामगारांसाठी 1 लाख 70 हजारां कोटींची मदत जाहीर केली आहे. तर वैद्यकीय कर्मचारांसाठी 50 लाख रुपयांचा आरोग्य विमा जाहीर केला आहे. या योजनेचा फायदा 20 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे.
पंतप्रधान गरीब कल्याण योजना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली की, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत 80 कोटी गरीब जनतेला स्वस्त दरामध्ये अन्नधान्य मिळेल. सरकारने सांगितलं की, गरीबांनी कोरोना व्हायरसच्या भीषण संकट काळात अन्नाची चिंता करू नये. गरीबांना 5 किलो धान्य तर मोफत मिळेलच पण त्याचबरोबर 1 किलो डाळ देखील मोफत मिळणार आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत रजिस्टर्ड सेल्फ हेल्प ग्रृपला कोलॅटरल फ्री लोनची मर्यादा 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे 7 कोटी परिवारांना फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना एप्रिल महिन्याच्या आधीच पहिला हप्ता पाठवण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. तसंच मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्यांचा पगार वाढवण्यात आला आहे. मनरेगा मजुरी 182 वरुन 202 केली आहे. 5 कोटी जनतेला याचा फायदा होणार आहे.