पेट्रोल डिझेल
मुंबई : शेअर मार्केट बंद होताना आठवड्याच्या शेवटी एक दिलासा देणारी बातमी आहे. जागतिक बाजारपेठेत मंदीचं सावट आहे. एकीकडे नोकऱ्या जात आहे. अशा परिस्थितीमध्ये डॉलर कमजोर झाला आहे. भारतीय रुपयाचं मूल्य वाढल्याने मोठा दिलासा मिळू शकतो. अमेरिकेतील महागाई कमी झाल्यानंतर डॉलर कमजोर झाला आहे. याचा फायदा भारतीय रुपयाला झाला आहे. शुक्रवारी भारतीय रुपया 1.01 रुपयांनी मजबूत होऊन 80.79 वर बंद झाला. 4 वर्षानंतर भारतीय रुपयाचं मूल्य एका दिवसात सर्वात जास्त झालं आहे. भारतीय अर्थव्यवस्था आणि सर्वसामान्यांसाठी रुपयातील ताकद खूप फायद्याची आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आपण आपले ८० टक्के कच्चे तेल परदेशातून विकत घेतो. अशा परिस्थितीत कच्चे तेल खरेदी करणे स्वस्त होईल. त्यामुळे देशांतर्गत पातळीवर महागाई कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारताची आयात भारताच्या निर्यातीपेक्षा जास्त आहे. भारतात अब्जावधींच्या वस्तू डॉलरच्या मूल्याच्या आधारे खरेदी केल्या जातात. यामुळे भारताला डॉलरच्या बदल्यात अधिक पैसे मोजावे लागत आहेत. आता डॉलरचे मूल्य जितके जास्त असेल, तितकी जास्त किंमत आयात मालासाठी भारताला मोजावी लागते. कच्चा तेलासाठी भारताला जास्त पैसे त्यामुळेच मोजावे लागतात. अमेरिकेत महागाई दर वेगानं खाली आला आहे. अमेरिकेत 7.7 टक्क्यांवर आहे. आता फेडर रिझर्व्ह बँकेनं पुन्हा व्याजदरात वाढ करू नये अशी अशा आहे. नाहीतर पुन्हा महागाई वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. CNBC आवाजने दिलेल्या वृत्तानुसार सॅन फ्रान्सिस्को फेडच्या अध्यक्षा मेरी डॅली आणि डल्लास फेडचे अध्यक्ष लॉरी लोगन यांनी महागाईच्या या आकडेवारीचे स्वागत केले. मात्र, महागाईविरोधातील युद्ध अद्याप संपलेले नाही, असा इशाराही त्यांनी दिला. मागणी आणि पुरवठ्यावर रुपयाचे मूल्य अवलंबून असते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कोणत्याही देशाचा परकीय चलन साठा कमी होत गेला की त्या देशाच्या चलनाची हालचाल बदलत राहते.बहुतेक देशांमध्ये डॉलर चलनात व्यापार केला जातो. त्यामुळे अमेरिकी डॉलरला जागतिक चलनाचा दर्जा आहे. भारतही आपला व्यवसाय डॉलरमध्ये करतो. अशा परिस्थितीत डॉलरच्या बदलत्या किमतींचा परिणाम भारतीय रुपयावर दिसून येतो.
भारतात कच्चा तेलाची आयात मोठ्या प्रमाणत होते. त्यामुळे रुपया मजबूत झाला तर त्याचा फायदा भारताला होईल. महागाईवर नियंत्रण मिळेल. कच्च तेल आयात करण्यासाठी कमी पैसे मोजावे लागतील. पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे.
भारतात इलेक्ट्रॉनिक वस्तू जास्त आयात केल्या जातात. त्यामुळे त्याच्या किंमती स्वस्त होऊ शकतात. ज्वेलरी सेक्टरवर आणि कृषी सेक्टरवरही त्याचे चांगले परिणाम होऊ शकतात. आता सोमवारी डॉलरची किंमत स्थिर राहिली तर त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळू शकतात.