Cryptocurrency Bill News: Cryptocurrency दररोज नवी उंची गाठत आहे. सध्या क्रिप्टोकरन्सी मार्केट 190 ट्रिलियन रुपयांचा झाला आहे. मात्र भारतात क्रिप्टोकरन्सीबाबत वेगळे वारे वाहू लागले आहेत. याठिकाणी क्रिप्टो नियंत्रित करण्याची औपचारिक सुरुवात आधीच झाली आहे. भारत सरकारने क्रिप्टोकरन्सी बिल आणण्याची घोषणा केल्यानंतर त्याची बाजारपेठ 15 टक्क्यांहून अधिक घसरली आहे. याठिकाणी जाणून घ्या क्रिप्टोकरन्सीच्या नावावर झालेल्या जगातील सर्वात मोठ्या फसवणुकीची कहाणी…
एके काळी, रुजा इग्नाटोव्हाला क्रिप्टोकरन्सीची राणी (Queen of Cryptocurrency) म्हटले जायचे. त्यावेळी रुजा इग्नाटोव्हाने लोकांना सांगितले होते की तिने शेअर बाजारात बिटकॉइनशी स्पर्धा करण्यासाठी क्रिप्टोकरन्सी शोधली आहे. कमी वेळात प्रचंड नफा कमावण्याचे आमिष दाखवून रुजाने लोकांना क्रिप्टोकरन्सीमध्ये लाखो कोटींची गुंतवणूक करण्याते पटवून दिले होते. लोकांना मोठी स्वप्ने दाखवून तिने क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून 30 हजार कोटी रुपयांची फसवणूक अगदी सहज केली होती.
बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, बल्गेरियाची रहिवासी रुजा इग्नाटोव्हा ती डॉक्टर असल्याचे सांगायची. Bitcoin चे यश पाहून रुजाने OneCoin ही क्रिप्टोकरन्सी लाँच केली.
एका ओपन प्लॅटफॉर्मवर लोकांना संबोधित करताना, रुझाने दावा केला की एका क्षणी OneCoin ही जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी बनेल आणि लोक त्यातून अपेक्षेपेक्षा जास्त नफा कमवू शकतील. अहवालानुसार, ऑगस्ट 2014 ते मार्च 2017 दरम्यान, जगभरातील अनेक देशांमधून सुमारे चार अब्ज युरो OneCoin मध्ये गुंतवले गेले.
लंडन, दुबई यांसारख्या अनेक मोठ्या देशात केलेल्या सेमिनारनंतर रुझाने अनेक लोकांना तिच्या या क्रिप्टोकरन्सीशी जोडले आणि तिच्या बोलण्याला फसून लोकांनी OneCoin मध्ये बेहिशेबी गुंतवणूक केली. त्या वेळी, OneCoin चे सर्वात लहान पॅकेज 140 युरो आणि सर्वात मोठे एक लाख 18 हजार युरो होते. लोकांना एक्सचेंज सुरू करण्याचे वचन देण्यात आले होते, ज्यात भविष्यात ते त्यांचे OneCoin डॉलर्स किंवा युरोमध्ये रूपांतरित करू शकतील. लोक याची वाट पाहत होते. लोकांना त्या वेळी केवळ OneCoin च्या किमतीतील मोठी उसळी दिसत होती.
OneCoin कडे ब्लॉकचेन तंत्रज्ञान नव्हते ज्यावर बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सी काम करतात. रुझाने OneCoin ला ब्लॉकचेनशी जोडण्याचा प्रयत्न केला, पण ती अयशस्वी झाली. रुझाने तिचा व्यवसाय आणखी वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे यादरम्यान क्रिप्टोकरन्सीच्या समर्थकांनी OneCoin गुंतवणूकदारांशी संपर्क साधू लागला. त्यांनी त्यांना सत्यही सांगितले. OneCoin चे बहुतेक गुंतवणूकदार या क्रिप्टोचे सत्य समजू शकले नव्हते.
गुंतवणूकदारांना संभ्रमात ठेवून रुझा देश-विदेशातील मालमत्ता खरेदी करण्यात व्यस्त होती. तिने बल्गेरियासह अनेक देशांमध्ये मालमत्ता खरेदी केली आणि अचानक गायब झाली. सोप्या भाषेत सांगायचे तर, हजारो आणि लाखो गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे दोन ते तीन पट वाढवण्याचे स्वप्न दाखवणारी क्रिप्टो क्वीन अचानक गायब झाली.
रुझाविरोधात आजवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. मात्र तिच्याबद्दल अद्याप कुणालाच माहिती मिळालेली नाही. मध्यंतरी तिचा मृत्यू झाल्याचीही बातमी समोर आली होती. तर कुणी असे म्हणते की ती अशा ठिकाणी लपली आहे, ज्याठिकाणाहून तिला शोधणे कठीण आहे.