प्रतिकात्मक फोटो
मुंबई : सध्याचा काळ बघता, आज आम्ही तुम्हाला एक खास बिझनेस आयडिया देत आहोत, ज्यात तुम्ही तुमच्या घराच्या रिकाम्या छताचा वापर करून लाखो रुपये कमवू शकता. आम्ही तुम्हाला सौर पॅनलच्या बिझनेसविषयी माहिती देत आहोत. ही पॅनल खरं तर कुठेही लावता येतात. तुम्ही तुमच्या घराच्या छतावर ही पॅनल लावून वीज निर्मिती करू शकता. यातून निर्माण झालेली वीज महावितरणला विकू शकता. शहरी तसंच ग्रामीण भागात दिवसेंदिवस विजेची मागणी वाढत आहे. त्यामुळे या माध्यमातून तुम्ही चांगलं उत्पन्न मिळवू शकता. सोलर अर्थात सौर ऊर्जा पॅनल लावण्यासाठी केंद्र सरकारकडून 30 टक्के अनुदान दिलं जातं. ही पॅनल बसवण्यासाठी सुमारे एक लाख रुपये खर्च येतो. खर्च किती येईल? लोकांनी सौर पॅनल लावावीत, यासाठी सरकार सातत्याने प्रोत्साहन देत आहे. काही राज्यांनी औद्योगिक क्षेत्रात सौर ऊर्जा प्रकल्प अनिवार्य केला आहे. त्यामुळे तुम्हालादेखील सौर ऊर्जा उत्पादनांच्या विक्रीचा व्यवसाय सुरू करण्याची मोठी संधी आहे. यात सोलर पीव्ही, सोलर थर्मल सिस्टिम, सोलर एटिक फॅन, सोलर कुलिंग सिस्टिमचा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता. विशेष म्हणजे, सौर ऊर्जेशीसंबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी स्टेट बॅंक ऑफ इंडियासह अनेक बॅंकांच्या एसएमई शाखेकडून कर्ज दिलं जातं. या प्रकल्पासाठीचा खर्च राज्यानुसार वेगवेगळा येतो. परंतु, सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानातून तुम्ही एक किलोवॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प केवळ 60 ते 70 हजार रुपयांत उभारू करू शकता. एक लाख रुपयांपर्यंत मिळेल उत्पन्न हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात फारशी गुंतवणूक करावी लागत नाही. परंतु, तुमच्याकडे फारसं भांडवल नसेल तर तुम्ही कोणत्याही बॅंकेकडून यासाठी कर्ज घेऊ शकता. यासाठी तुम्ही सौर अनुदान योजना, कुसुम योजना, राष्ट्रीय सौर ऊर्जा मिशन अंतर्गत बॅंकेतून एसएमई कर्ज घेऊ शकता. एका अंदाजानुसार, तुम्ही या व्यवसायातून महिन्याला 30 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत अगदी सहज उत्पन्न मिळवू शकता. सौर पॅनलचे फायदे एका सौर पॅनलचं आर्युमान 25 वर्षं असतं. तुम्ही हे पॅनल तुमच्या घराच्या छतावर अगदी सहजपणे बसवू शकता. सूर्यप्रकाश या पॅनलवर पडेल आणि त्याचं वीजेत रूपांतर होईल त्यामुळे तुम्हाला मोफत वीज उपलब्ध होईल. तसंच तुम्ही ग्रीडच्या माध्यमातून सरकार किंवा कंपन्यांना शिल्लक वीज विक्री करू शकता. याचाच अर्थ तुम्हाला घरच्या वापरासाठी वीज मोफत मिळेलच; पण त्यासोबत कमाईदेखील करता येईल. जर तुम्ही घराच्या छतावर दोन किलोवॅटची सौर पॅनल बसवली तर त्याद्वारे 10 तासांच्या सूर्यप्रकाशातून सुमारे 10 युनिट वीज निर्मिती होईल. महिन्याचा हिशेब करायचा झाला तर किमान 300 युनिट वीज निर्मिती होईल. मेंटेनन्स सौर पॅनलचा मेंटनन्स अगदी सोपा आहे. दर 10 वर्षांनी पॅनलला जोडलेली बॅटरी बदलावी लागते. यासाठी सुमारे 20 हजार रुपये खर्च येतो. तसंच सौर पॅनल तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणीदेखील घेऊन जाऊ शकता.