नवी दिल्ली, 19 सप्टेंबर : काही दिवसांत सणासुदीला (Festival) सुरुवात होणार आहे. सणासुदीच्या निमित्तानं खरेदी (Shopping) करायला खूप जणांना आवडतं. बहुतांश कंपन्या या कालावधीत शॉपिंगसाठी अनेक सेल्स (Sale) आणि ऑफर्स (Offers) देतात. सेलचं नाव ऐकताच सर्व जण लगेच शॉपिंगचा विचार करू लागतात. सणासुदीच्या काळात सेलची वाट पाहिली जाते आणि शॉपिंगसाठी मोठी यादीही तयार ठेवली जाते. या आठवड्यात फ्लिपकार्ट (Flipkart) आणि अॅमेझॉन (Amazon) या दोन दिग्गज कंपन्यांसह अनेक ई-कॉमर्स कंपन्या मोठा सेल सुरू करत आहेत. अॅमेझॉनच्या `ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल`ला (Great Indian Festival Sale) आणि फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलला (Big Billion Days Sale) 23 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. दोन्ही कंपन्यांच्या या सेलमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या वस्तूंवर डिस्काउंट (Discount) ऑफर पाहायला मिळतील. तुम्ही तुमच्या गरजेनुसार शॉपिंग करू शकता. ऑनलाइन शॉपिंगचे अनेक फायदे आहेत. परंतु, त्यासोबत फसवणूक होण्याची शक्यताही असते. सेलमध्ये शॉपिंग करताना काही खास गोष्टींची काळजी घ्यावी लागेल, जेणेकरून तुम्ही कोणत्याही प्रकारची ऑनलाइन फसवणूक टाळू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खास गोष्टी सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे पैसे वाचतील आणि तुम्ही फसवणुकीला बळी पडणार नाही. वस्तू खरेदीवेळी विक्रेत्याची तपासणी करा सेलमध्ये शॉपिंग करणारे 90 टक्के जण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. शॉपिंगमध्ये विक्रेत्याची (Seller) भूमिका खूप महत्त्वाची असते. तुम्हाला तोच माल अनेक विक्रेत्यांकडे मिळेल. परंतु, ई-कॉमर्स कंपन्यांनी ज्या विक्रेत्यांना चांगलं रेटिंग दिलं आहे, त्यांच्याकडूनच वस्तू खरेदी करा. तुम्ही अॅमेझॉनवरून खरेदी करत असाल तर अॅमेझॉन फुलफिल्ड विक्रेत्यांकडूनच वस्तू घ्या. तुम्ही फ्लिपकार्टवरून वस्तू घेत असाल तर संबंधित विक्रेता मान्यताप्राप्त असावा. उत्पादनाची तपासणी करा एक हुशार खरेदीदार त्याचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवतो. खरेदीवेळी बहुतांश जण ऑफर्सवर लक्ष केंद्रीत करतात; पण ते उत्पादनाविषयी (Product) बारकाईने माहिती घेत नाहीत. जेव्हा तुम्ही कोणतीही वस्तू अॅमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरून खरेदी करत असाल तेव्हा उत्पादनाची बारकाईनं तपासणी करा. ती वस्तू ज्या कंपनीनं उत्पादित केली आहे, त्या कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन उत्पादनाचा तपशील तपासून घ्या. किराणा मालाकडे विशेष लक्ष द्या बिग बिलियन डेज सेल आणि ग्रेट इंडियन सेलमध्ये अॅमेझॉन, तसंच फ्लिपकार्टवर किरणा मालावर (Grocery) मोठी सूट दिली जाते. बहुतांश किराणा मालाची मुदत संपण्याची तारीख मर्यादित असते. कोणत्याही वस्तूची एक्सपायरी डेट त्याच्या वापराची कमाल मर्यादा ठरवते. अशा परिस्थितीत तुम्ही खरेदी करत असलेला माल किती दिवस वापरू शकता हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. अनेक वेळा स्वस्त किमतीच्या नादात असा माल खरेदी केला जातो, की जो काही दिवसांनी वापरताही येत नाही. कॅशबॅकच्या ऑफरच्या जाळ्यात अडकू नका फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन युझर्सना वर्षातल्या सर्वांत मोठ्या सेलमध्ये कॅशबॅक ऑफर (Cashback Offer) करतात. अनेक वेळा ठरावीक किंमत असूनही खूप जण कॅशबॅकमध्ये अडकतात. तुम्ही अशी चूक करू नका. कॅशबॅकमध्ये अनेक अटी आणि नियम लागू असतात. शॉपिंग करण्यापूर्वी त्यांच्याकडे लक्ष द्या. रिव्ह्यू आणि रेटिंगकडे लक्ष द्या कोणत्याही हुशार ग्राहकाने त्याला ऑफरवर मिळणाऱ्या सर्व वस्तूंचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून पैसे वाया जाणार नाहीत. कोणतीही वस्तू खरेदी करताना, त्याचे कस्टमर रिव्ह्यू (Review) आणि उत्पादनाचं रेटिंग (Rating) अवश्य तपासा. नो कॉस्ट ईएमआय टाळा सेलच्या दरम्यान नो कॉस्ट ईएमआय (No-cost EMI) ऑफर दिली जाते. यात युझर्सना असं वाटतं की त्यांनी ईएमआयवर कोणतीही वस्तू खरेदी केली तर त्यांना व्याज द्यावं लागणार नाही; पण यामध्येही अनेक अटी लागू असतात. शॉपिंग करतेवेळी या गोष्टीकडे लक्ष द्या. उत्पादनाची एमआरपी तपासा ग्रेट इंडियन सेल आणि बिग बिलियन सेलमध्ये तुम्हाला 80 टक्क्यांपर्यंत सूट असलेल्या ऑफर मिळू शकतात. काही जणांना अशा ऑफर पाहून शॉपिंग करण्याची इच्छा होते; पण याबाबत सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. काही वेळा सूट आणि किमतीमध्ये फारसा फरक नसतो; पण तुम्हाला आकर्षित करण्यासाठी त्या उत्पादनाची एमआरपी (MRP) खूप जास्त लिहिली जाते. त्यामुळे मोठी सूट असलेली उत्पादनं खरेदी करताना, इतर साइट्सवर त्या उत्पादनाची किंमत काय आहे, हे निश्चितपणे तपासा. रिटर्न पॉलिसी तपासा अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर अशा अनेक वस्तू असतात, ज्यावर रिटर्न पॉलिसीऐवजी (Return Policy) केवळ एक्स्चेंज पॉलिसी लागू असते. तुम्ही अशी कोणतीही वस्तू खरेदी करत असाल, ज्यामध्ये तुम्हाला वाटतं की तुम्ही ती परत करू शकता, तर ती खरेदी करण्यापूर्वी रिटर्न पॉलिसी अवश्य तपासा. सुपर कॉइन्सचा वापर करा तुम्ही फ्लिपकार्टवर शॉपिंग करत असाल, तर तुम्हाला सुपर कॉइन्सविषयी (Super Coins) नक्कीच माहिती असेल. दोन्ही कंपन्यांकडून सेलमध्ये, डेबिट कार्ड म्हणजेच एटीएमऐवजी क्रेडिट कार्डच्या वापरावर जास्त ऑफर्स दिल्या जातात. पैसे वाचवायचे असतील आणि सेलचा फायदा घ्यायचा असेल, पण तुमच्याकडे क्रेडिट कार्ड नसेल तर तुम्ही तुमच्या मित्रांमार्फतही खरेदी करू शकता.