प्रियांका बोबडे, प्रतिनिधी अहमदनगर, 11 मार्च: अनेक तरुण शिकणं पूर्ण झालं की नोकरी कडे वळतात. ग्रामीण भागातील बरेच तरुण शहरात जाऊन काही तरी नोकरी करत असतात. सध्या बेरोजगारीचा दर जास्त असल्याने अनेकांना नोकरी मिळतही नाही. मग तरुण हाताला जे काम मिळेल ते करतात. पण आता तरुण शेतीकडे व्यवसायिक पद्धतीने पाहू लागले आहेत. आधुनिक पध्दतीने शेती केली तर शेती सुध्दा खूप फायद्याची ठरू शकते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील निशांत बाळासाहेब गुंजाळ हा बीएससीचं शिक्षण घेतलेला तरुण शेतकरी आहे. कशी झाली सुरूवात? निशांत हा तरुण नेवासा तालुक्यातील रामडोह येथील रहिवाशी आहे. कुटुंब शेतकरी असल्यामुळे निशांतला लहानपणापासून शेतीची आवड होती. बीएससी पदवी पूर्ण झाल्यानंतर नोकरी न करता आधुनिक शेती करण्याचा निर्णय त्याने घेतला. सध्या नोकरी मिळणं खूप कठीण असून मिळाली तरी पगार 15-16 हजार मिळतो. सध्याच्या महागाईमुळे एवढा कमी पगार परवडू शकणार नाही. त्यापेक्षा शेती हा उत्तम पर्याय असल्याने तो निवडला, असे निशांत सांगतो.
केळीची शेती फायद्यात गेल्या वर्षी निशांतने 45 टन केळीच उत्पन्न घेतलं. त्याला 5 लाख रुपये फायदा झाला. जैन टिश्यू कल्चर वाणाच्या केळीच्या रोपाची लागवड केली. याचे एक रोप 15 रुपयांना मिळते. एका एकरामध्ये 1700 ते 1800 रोपांची लागवड होऊ शकते. तर त्याला 40 हजार रुपये खर्च येतो. सुरुवातीच्या काळात 4 दिवसाला पाणी द्यावं लागतं. दोन महिने कीटकनाशक फवारणी करावी लागते. केळीची एकदा लागवड केली की त्या ठिकाणी 30-40 घडांचे उत्पन्न मिळते. 30 लाखांचं पॅकेज सोडून सुरू केली स्ट्रॉबेरीची शेती, आता तरुणाची होतेय बम्पर कमाई! केळी बारमाही पीक केळी हे बारमाही फळ असून त्याला कायम मागणी असते. अलीकडच्या काळात केळीला भाव चांगला मिळत आहे. पूर्वी 8 रुपये भाव मिळत होता. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. केळीला होलसेल भाव हा 20-23 रुपये मिळतो. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो. भावामध्ये चढ उतार झाले नाही तर यंदा देखील 25 लाख पर्यंत फायदा होऊ शकतो, असा विश्वास निशांत व्यक्त करतो.