मुंबई, 11 जुलै : कुर्ल्यातील नाईक नगरमध्ये काही दिवसापूर्वी इमारत कोसळली. या दुर्घटनेत अनेकांचा दुर्देवी मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर पालिका प्रशासन ( Municipal administration ) आणखी सतर्क झाले आहे. पालिकेकडून पावसाळ्याआधी शहरातील धोकादायक असलेल्या इमारतींची (dangerous building) नाव जाहीर करुन नोटीसही पाठवण्यात आल्या आहेत. मात्र, त्यानंतरही नागरिक (Citizen) आपल्या जीवावर उदार होऊन तिथेच जीर्ण इमारतीतच राहतात. यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, आमचा नाईलाज असल्याने आम्हाला जीव मुठीत घेऊन रहावं लागतंय. आम्हाला राहतं घरं सोडून भाड्याने राहणं आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाही, अशा प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिल्या. नक्की या नागरिकांचं म्हणंन काय, जाणून घेऊयात या रिपोर्टमधून… पावसाळा येताच मुंबईची तुंबई होते. दुरवस्था झालेल्या अनेक इमारती मुंबई शहरात आहेत. अनेक कामगार, कुटुंबे स्वतःचा जीव मुठीत धरून इथे राहतात. कामाठीपुरा, कुर्ला, मानखुर्द, गोवंडी, डोंगरी या अनेक भागात धोकादायक इमारती आहेत. येथे अनेक लोक वास्तव्यास आहेत. कुजलेल्या भिंती, सडलेले दरवाजे, असे विविध भाग आपल्या निदर्शनास पडतात. मात्र, अजुनही लोक, मजदुर भाडे परवडत नाही म्हणुन या भागात राहतात. कामाठीपुरा मध्ये गल्ली नंबर 2, 3 मध्ये काही इमारती धोकादायक आहेत. तसेच सातव्या गल्लीत इमारत क्रमांक 67,69 या इमारतीमध्ये देखिल लोक धोका पत्करून राहताना दिसत आहेत. वाचा : ‘आता थांबायचं नाय…’ शिवसेना-शिंदे गटाच्या राड्यानंतर आता राज ठाकरे मैदानात! नागरिक काय म्हणतात? बिहार मधुन स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी आलेले अफजल खान म्हणतात की, “पोटापाण्यासाठी राहावे लागते. माझा इलेक्ट्रोनिक साहित्य विकण्याचा व्यवसाय आहे. या आधी या इमारतीची हालत नाजूक होती मात्र डागडुजी केली आहे. तरी पावसाळ्यात त्रास होतोच.” अफजल खान गेले अनेक वर्षे मुंबईत राहतात. कामाठीपुरा मध्ये त्यांचं वास्तव्य आहे. शहरामध्ये खुप भाडे असल्याने मोठ्या भागात राहणे परवडत नाही जिथे कमी भाडे असेल कमी डिपॉझिट असेल तिथे ते राहतात . मूळचे उत्तरप्रदेशचे आणि सध्या मुंबईत कामाठीपुरा येथे राहणारे कमल यादव म्हणतात, “काय करनार पोटासाठी राहावं लागत, मुंबई शहरात राहण्यासाठी भरगच्च भाडे द्यावे लागते, परवडत नाही पण पैसे कमावण्यासाठी राहावे लागते, शेवटी पैसे आहेत तर इज्जत आहे.” हे शब्द आहेत गेले 20 वर्षे मुंबईत राहणाऱ्या कमल यादव यांचे. 10 बाय 10 खोलीच्या खोलीत राहतात कामगार मुंबई दक्षिण भागात डोंगरी, जे .जे कलबदेवी , चेंबूर, कामाठीपुरा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 10 बाय 10 खोलीत कामगार वर्ग वास्तव्यास आहे. परराज्यातून कामगारांचा ओढा हा मुंबईकडे अधिक आहे . उत्तरप्रदेश, कोलकाता , बिहार, राजस्थान अशा राज्यातून हजारो मजूर पोटापाण्यासाठी येत असतात. वाचा : एकनाथ शिंदे गटाला मिळाला ‘सुप्रीम’ दिलासा, शरद पवार म्हणाले… प्रशासन काय म्हणते? म्हाडाचे मुख्य अधिकारी अरुण डोंगरे म्हणाले की, “आम्ही 21 इमारतींना नोटीस दिली आहे . ज्या धोकादायक इमारती आहेत त्यांना खाली करण्याचं काम सूरु आहे. काही इमारती धोकादायक असून काही लोक स्वतःच्या जबाबदारीवर राहत आहेत. मात्र, ज्या इमारती अतीधोकादायक आहेत त्यांना खाली करणे चालू आहे.” पालिकेकडून धोकादायक इमारतींबाबत मिळालेली माहिती जीर्ण अवस्थेत असलेल्या इमारती - 462 पाडलेल्या इमारती - 136 दुरुस्तीसाठी घेतलेल्या इमारती - 18 राहिलेल्या इमारती - 308