मुंबई, 22 डिसेंबर : दिशा सालियान प्रकरणावरून पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे. बुधवारी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. रिया चक्रवर्ती यांना AU नावाने अनेक कॉल आले होते असं शेवाळे यांनी म्हटलं. त्यानंतर या वादात भाजप नेते नितेश राणे यांनी देखील उडी घेतली. दिशा सालियान प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे आहे, त्यामुळे मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो की केस पुन्हा ओपन करावी असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. तसंच दिशा सालियान प्रकरणात इतर राजकीय नेत्याचं नाव का घेतलं जात नाही, फक्त आदित्य ठाकरे यांचंच नाव का घेत जातं असा सवालही नितेश राणे यांनी केला आहे. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियान प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी होणार असल्याची घोषणा केली आहे. पाहुयात नेमकं काय आहे? दिशा सालियान प्रकरण. कोण आहे दिशा सालियान दिशा सालियान या अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या व्यवस्थापक होत्या. 8 जून 2020 ला मुंबईमध्ये घराच्या बालकनीमधून खाली पडून दिशा यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येची नोंद केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्यूपूर्वी दिशाने आपल्या लंडनमधील एका मैत्रिणीला फोन केला होता. आपल्या मैत्रिणीशी बोलताना दिशा थोडी चिंतेत वाटत होती. वर्कलोड जास्त असल्याचं तिने आपल्या मैत्रिणीला सांगितलं. त्यानंतर थोड्याचवेळात तिचा होणारा नवरा रोहन याने दिशा ज्या खोलीत राहात होती त्या घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र दिशा त्या खोलीमध्ये नव्हती. त्याने खिडकीतून खाली पाहिलं असता दिशा पडलेली दिसली. हेही वाचा : disha salian : दिशा सालियान प्रकरणाचा तपास CBI कडे नव्हता, नितेश राणेंचा नवा शोध सीबीआयचा निष्कर्ष काय? या प्रकरणाचा तपास सध्या मुंबई पोलिसांकडे आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय देखील करत आहे. या प्रकरणाचा तपास करून सीबीआय एका निष्कर्षावर पोहोचली आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयने वेगळा गुन्हा दाखल केला नव्हता. मात्र सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात हे प्रकरणही तपासण्यात आलं. दिशाचा मृत्यू झाला त्यादिवशी ती नशेत होती आणि तोल गेल्याने छतावरून खाली पडून तिचा मृत्यू झाला असं सीबीआय तपासात समोर आलंय. दरम्यान दिशा सालियान प्रकरणात अनेक आरोप करण्यात आले होते, मात्र यातील एकही आरोप सिद्ध न झाल्याने दिशा सालियन केस बंद करण्यात आल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं.