कोल्हापूर, 21 सप्टेंबर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी आज कोल्हापुरात नवी संघटना स्थापन केलीय. रयत क्रांती संघटना असं त्यांच्या नव्या संघटनेचं नाव आहे. नव्या संघटनेची स्थापना करतानाही राजू शेट्टींवर टीका करायला ते विसरले नाहीत. मला नेता म्हणून नाहीतर कार्यकर्ता म्हणून जगायचं आहे. असं सांगत आता नांगरणी मीच करणार, पेरणी मीच करणार, खळ्याची मालक मात्र रयतच राहिलं, अशी नवी घोषणाही सदाभाऊंनी यावेळी केली. राज्यातल्या 353 तालुक्यात प्रत्येकी पाच हजार कार्यकर्ते याप्रमाणे पुढच्या सहा महिन्यात संघटनेची सभासद संख्या 17 लाखांवर नेऊ, असा दावाही सदाभाऊ खोत यांनी यावेळी केलाय. सरकार उसाला चांगला एफआरपी देणार असल्याने यंदा ऊस दराचे आंदोलन करण्याची गरज नसल्याचंही सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय. मला कुठलं दुकान चालवायचं नाही, शेतकऱ्याला चालवायचं आहे, पण काही लोकांना माझं मंत्रिपद बघवलं नाही, म्हणूनच मला स्वाभिमानीतून बाहेर पडावं लागल्याचं सदाभाऊ खोत म्हणाले. ‘मी माझ्या आईकडून बिल्ला लावून घेतलाय आता माझा बिल्ला काढायला कुणी येणार नाही बिल्ला काढायची ताकद कुणाच्या हातात नाही कार्यकर्त्यांचाही बिल्ला काढला जाणार नाही, आपण दुसऱ्याला नावं ठेवण्यापेक्षा कामातून मोठे होऊया, ’’ असंही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले.