मुंबई, 07 जून: मुंबई (Mumbai) सह कोकणात( Kokan) अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मुंबईसह (Mumbai Rain) कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये 9 ते 12 जून या चार दिवसात अतिवृष्टीचा होणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या चार दिवसांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणाऱ्या सर्व यंत्रणेनं, सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेनं सज्ज आणि सतर्क राहून काम करावे तसंच परस्परांशी योग्य समन्वय ठेवण्याचे निर्देश दिलेत. अतिवृष्टीच्या या काळात आवश्यक तिथे NDRF आणि SDRFच्या तुकड्या तैनात कराव्यात, ओएनजीसी सह इतर केंद्रीय संस्थांना या काळात होणाऱ्या अतिवृष्टीची माहिती देऊन सतर्क राहण्यास सांगण्यात यावे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने मुंबई महानगर क्षेत्र, कोकणातील सर्व जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा बैठक घेतली. हेही वाचा- चांगली बातमी! सलग दुसऱ्या दिवशी देशातला कोरोना रुग्णांचा आकडा कमी मुंबई पालिका सज्ज मुंबईत ज्या ठिकाणी पावसाचं पाणी साचतं अशा ठिकाणी 474 पंप बसवण्यात आल्याची माहिती मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे. या पंपाद्वारे साचलेल्या पाण्याचा निचरा केला जाईल.अतिवृष्टीच्या काळात पूर व्यवस्थापनासाठी ज्युनिअर इंजिनिअर स्पॉटवर राहून पाणी निचऱ्याचे काम करतील असेही ते म्हणाले. हिंदमाताच्या परिसरात दोन मोठे टँक केले असून यामध्ये परिसरात साचलेले पाणी वळते करून साठवण्याची व्यवस्था केल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईत तीन तासात बरसणार पाऊस भारतीय हवामान खात्याच्या मुंबई वेधशाळेनं नुकत्याच वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन तासांत मुंबई शहरासह, उपनगरात आणि जिल्ह्यात तुरळक ठिकाणी कमी ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आकाशात विजा चमकत असताना नागरिकांनी मोठ्या झाडाच्या आडोशाला उभं राहू नये, असा सल्लाही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.