या बैठकीला विनायक मेटे यांना बोलावण्यात आले होते. पण मराठा आरक्षणाची बैठक आज दुपारी 4 वाजता होती. मात्र
मुंबई, १४ ऑगस्ट - शिवसंग्राम संघटनेचे नेते अध्यक्ष विनायक मेटे (vinayak mete) यांचं अपघाती निधन झालं आहे. मेटे यांच्या अपघाती निधनामुळे समर्थक कार्यकर्ते हादरले आहे. आपला नेता सोडून गेल्यामुळे कार्यकर्ते भावनाविवश झाले आहे. आज संध्याकाळी बोलावलेली बैठक रद्द करून दुपारी का बोलावण्यात आली होती, असा संशय मराठा मोर्चा समन्वयकांनी व्यक्त केला आहे. मेटे यांच्या अपघात प्रकरणाची चौकशीची मागणी केली आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर (mumbai pune expressway) विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. पण या अपघातावरून आता कार्यकर्त्यांनी काही प्रश्न उपस्थितीत केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाची आज संध्याकाळी बैठक बोलावली होती. या बैठकीला विनायक मेटे यांना बोलावण्यात आले होते. पण मराठा आरक्षणाची बैठक आज दुपारी 4 वाजता होती. मात्र काहींच्या आग्रहामुळे ती अचानक 12 वाजता आयोजित करण्यात आली, असा आरोप मराठा मोर्चा समन्वयक दिलीप पाटील यांनी केला आहे. अचानक बैठकीचा वेळ का बदलण्यात आला. त्यामुळे अनेक नेते रात्री उशिरा मुंबईच्या दिशेने निघाले, बैठक 4 वाजता असती तर मेटे वाचले असते, असंही पाटील म्हणाले. पोलीस घेत आहे ट्रकचा शोध दरम्यान, आज पहाटे विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. गाडीमध्ये त्यावेळी तीन व्यक्ती होते. जखमी व्यक्तींना तातडीने पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास केला जात आहे. तपासातून सर्वबाबी समोर येईल. एक मोठा ट्रक होता, या ट्रकला पाठीमागून कार धडकली आहे, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक दुधे यांनी दिली. तसंच, सध्या या प्रकरणी गुन्हा दाखल केला जात आहे त्यानंतर तपास केला जाणार आहे. तो ट्रक घटनास्थळावरून निघून गेला आहे. त्याचा शोध घेतला जात आहे. एकूण ८ टीम तपास करत आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे, अशी माहितीही दुधे यांनी दिली. या अपघातात चालक सुखरूप आहे. तर डाव्या बाजूला पुढे अंगरक्षक पोलीस तर मागे विनायक मेटे बसले होते. अपघातग्रस्त गाडीला डाव्या बाजूला जास्त क्षती पोहोचली आहे. अपघाताची माहिती समजतात, देवदूत रेस्क्यू यंत्रणा,अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्था आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. दुर्दैवाने उपचारादरम्यान विनायक मेटे यांचं अकाली निधन झालं. तर त्यांच्या अंगरक्षक याच्यावर पनवेलच्या MGM रुग्णालयात अति दक्षता विभागात उपचार सुरू आहेत. डोक्याला मार लागल्यामुळ मेंटेंचा मृत्यू ‘विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आणि धक्कादायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आज सकाळी 6 ते 6.30 वाजेच्या सुमारास मला माहिती मिळाली. त्यांच्या गाडीला अपघात कसा याची माहिती घेत होतो. त्यानंतर रुग्णालयात आलो तेव्हा साधारणपणे डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचं निधन झालं अशी प्राथमिक माहिती डॉक्टरांनी दिली अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ‘तळागाळातील विषयांची साकल्याने माहिती त्यांना असायची आणि त्यातून एखाद्या गोष्टीसाठी पाठपुरावा कसा करायचा हे त्यांना ठावूक असायचे. त्यामुळेच राज्याच्या राजकारणात त्यांनी आपले वेगळे अस्तित्व सिद्ध केले. मराठा समाजाला नेतृत्व देणारे व्यक्तिमत्व आज हरपले आहे. गेल्याच महिन्यात त्यांचा वाढदिवस साजरा झाला. अगदी या आठवड्यात सुद्धा मंत्रालयात विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा झाली होती आणि आज काळाने त्यांना आपल्यातून हिरावून नेले, अशी भावना फडणवीस यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश दरम्यान, मेटे यांच्या निधनाची अत्यंत दु:खद आणि वेदनादायी बातमी आहे. विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे. मराठा आरक्षणासाठी मेटेंनी लढा दिला. अनेक आंदोलनं केली. शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी त्यांनी काम केलं होतं. प्रत्येक वेळा त्यांची भेट झाली तेव्हा ते मराठा आरक्षणाबद्दल बोलत होते. आम्ही सगळे त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत. त्यांच्या कुटुंबीयांना दु:ख पचवण्याची शक्ती मिळो, अशी भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. ‘आज मराठा आरक्षणासाठी महत्त्वाची बैठक बोलावली होती. याच बैठकीसाठी ते येत होते. नेमका त्यांचा अपघात कसा झाला याबद्दल चौकशी केली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.