नागपूर 20 फेब्रुवारी : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरच्या न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपविल्याचा त्यांच्यावर आरोप होता. फडणवीस हे आज न्यायालयात उपस्थित झाला. 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केलाय. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. नागपुरातील 2 गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा फडणवीसांवर आरोप आहे. यातील एक मानहानीचा खटला आणि दुसरा फसवणुकीचा खटला आहे. सत्र न्यायालयाने याबाबत फडणवीसांना समन्स बजावला होता. त्यामुळे ते कोर्टात हजर होते. जामीन मंजूर झाल्यानंतर फडणवीसांनी प्रतिक्रिया व्यक्त केली की, दोन खासगी तक्रारी माझ्याविरुद्ध करण्यात आल्या होत्या. यात माझ्यावर वैयक्तिक आरोप नाहीत. या सगळ्या आंदोलनाच्या केसेस आहेत. एक केस 1995-98 ची आहे. सर्व केसेस या लोकांच्या संघर्षासाठी आहेत. मी कोर्टात माझी बाजू मांडली आहे मला कोर्टाकडून न्याय मिळेल. या सगळ्यामागे कोण आहे हे चांगलंच माहित आहे. झोपडपट्टी हटाव मोहिमे विरुद्ध आंदोलन करताना हे गुन्हे लावण्यात आले होते. निवडणुकीच्या काळात इतर सर्व गुन्ह्यांची माहिती दिली होती. फक्त वकिलाच्या सांगण्यावरून ही माहिती दिली नव्हती. त्यात लपविण्यासारखं काहीही नाही. कोर्टात सगळं सिद्ध होईल असंही ते म्हणाले. कोर्टाच्या या निर्णयामुळे फडणवीसांना दिलासा मिळालाय.