Vedanta Chairman Anil Agrawal
मुंबई, 14 सप्टेंबर : वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. आदित्य ठाकरे तसंच राष्ट्रवादी आणि काँग्रेसने प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्य सरकार आणि भाजपवर टीका केली आहे, तर सरकारने मात्र याला महाविकासआघाडीचं तत्कालिन सरकारच जबाबदार असल्याचा दावा केला आहे. 1 लाख 54 हजार कोटींच्या या प्रकल्पामुळे राज्यात 1 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार होत्या. या सगळ्यानंतर आता वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले अनिल अग्रवाल? ‘केपीएमजी आणि आमची टीम सगळ्या राज्यांमध्ये गेली होती, त्यांनी गुजरातला पसंती दिली. देशात सिलिकॉन पॉलिसी सुरू करणारं गुजरात पहिलं राज्य आहे, त्यामुळे आमच्या स्वतंत्र यंत्रणेने हे प्रोजेक्ट गुजरातला स्थापन करण्याचं ठरवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे केलं आहे, असं कोणत्याही परिस्थितीमध्ये समजू नका,’ असं अनिल अग्रवाल म्हणाले. ‘महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशकडूनही आम्हाला प्रस्ताव आला होता. गुजरातच्या युनिटमध्ये दुसरा प्लांट सुरू करण्याचाही आमचा विचार आहे. 2024 पासून गुजरात युनिटमधून प्रॉडक्शनला सुरूवात होईल. या प्रकल्पासाठी मिळालेली जमीन 400 एकर भागात पसरली आहे, तसंच अहमदाबादपासून प्रकल्पासाठीची जमीन जवळ आहे,’ असं वक्तव्य अनिल अग्रवाल यांनी केलं. ‘हाय-टेक क्लस्टर उभारणीसाठी वेदांता आणि फॉक्सकॉन एकत्र काम करणार आहे. यासाठी आम्हाला जमीन, सेमी कंडक्टर ग्रेड वॉटर, उच्च दर्जाची उर्जा, लॉजिस्टिक आणि कुशल कामगार यांची गरज आहे. या प्रोजेक्टमधून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल, तसंच राज्य सरकारलाही मोठा महसूल मिळेल,’ अशी प्रतिक्रिया अग्रवाल यांनी दिली. ‘गुजरात प्लांटमुळे स्टार्ट अपच्या संधीही मोठ्या प्रमाणावर तयार होतील. इतर इंडस्ट्रीजही इकडून त्यांच्या कामाला सुरूवात करतील, त्यामुळे हा परिसर भारताची सिलिकॉन व्हॅली होईल,’ असा विश्वास अग्रवाल यांनी व्यक्त केला. ‘चिप बनवण्याच्या युनिटसाठी आम्ही इंडस्ट्रीयल क्लस्टर उभारणीला प्रोत्साहन देणार आहेत, यासाठी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि आंध्र प्रदेश सरकारसोबत बोलणी सुरू आहेत,’ असं अनिल अग्रवाल यांनी सांगितलं.