उस्मानाबाद, 19 ऑक्टोबर : वन्य पशुपक्ष्यांसाठी नेहमीच अभयारण्य राखून ठेवली जातात. सरकारतर्फे या अभयारण्याचीही व्यवस्था ठेवली जाते. अनेकदा ही अभयारण्य पर्यटनासाठीही खुली केली जातात. पशुपक्ष्यांचं संवर्धन व्हावं हाच अभयारण्य किंवा वनक्षेत्र राखून ठेवण्यामागचा हेतू असतो. पण महाराष्ट्रातल्या उस्मानाबाद जिल्ह्यात एक अद्भूत प्रथा पाळली जाते. सामान्यत: मनुष्यप्राणी जमीनजुमला, मालमत्ता यासाठी कायम झटत असतो. परंतु, उस्मानाबाद मधल्या एका गावी काही एकर जमीन ही माकडांच्या नावे आहे. जाणून घेऊयात या अजब प्रथेबाबतची सविस्तर माहिती. याबद्दलची माहिती देणारं वृत्त ‘झी न्यूज हिंदी’ने दिलं आहे. उस्मानाबद जिल्ह्यात उपळा नावाचं गाव आहे. इथे एक नाही, दोन नाही तर 32 एकर जमीन माकडांच्या नावे आहे. अर्थात, या 32 एकर जमिनीवर माकडांचा मालकी हक्कच आहे. चक्रावून टाकणारीच ही गोष्ट आहे. इतकंच नाही तर या उपळा गावात एखादं माकडं घराच्या दारापाशी आलं, तर त्याला रिकाम्या हाताने पाठवलं जात नाही. काहीतरी खाद्यपदार्थ त्याला दिले जातात. हे केवळ भीतीपोटी नाही तर हा माकडांचा मान राखण्याची एक पद्धत आहे. तसंच गावात कुठे लग्न असलं, आणि तिथे माकडं आली तर त्यांचा आदर राखला जातो. उपळा ग्रामपंचायतीकडे गावाच्या एकंदर जमिनीचा सातबारा आहे. त्यात प्रत्येक व्यक्तीच्या नावे काही जमीन आहे. त्या सातबाऱ्यावर 32 एकर जमीन ही माकडांच्या मालकीची असल्याचा उल्लेख आहे. या माकडांची कशाप्रकारे बडदास्त राखली जाते हे जाणून घेऊयात. ‘ मंकी बात’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ठाण्यात हनुमानाच्या दर्शनासाठी अवतरले माकड! गावातील लोकं माकडांचा करतात उत्तम पाहुणचार उपळा गावचे सरपंच बाप्पा पडवळ यांनी याबद्दल काही गोष्टींचा खुलासा केला. वन विभागातर्फे या जमिनीच्या काही भागात वृक्षारोपण करण्यात आलंय. त्यातील एका भागात एक जुनाट घरं होतं, जे आता मोडकळीस आलंय. सरपंच पुढे म्हणाले, ‘पूर्वी गावात जेव्हा लग्न व्हायचं, तेव्हा माकडांना पहिला आहेर केला जायचा. त्यानंतरच लग्न सोहळ्याला सुरूवात व्हायची; पण आता ही प्रथा कुणीच पाळत नाही. आजही जेव्हा माकडं गावकर्यांच्या दारापाशी येतात, तेव्हा गावकरी आनंदाने त्यांना जेवू-खाऊ घालतात. गावात दाराशी आलेल्या माकडांना कुणीच उपाशी ठेवत नाही.’ सरकारी कागदपत्रांतूनही जमिनीच्या मालकीची दिसते नोंद सरपंच पडवळ म्हणाले, ‘सरकारी कागदपत्रांतूनही जमिन माकडांच्या नावे असल्याच म्हटलंय. पण ही नोंद कोणी आणि कशी केली याबद्दल काहीच माहिती नाही.’ ते पुढे म्हणाले, ‘पूर्वी गावातील प्रत्येक सोहळ्यात माकडांना सामावून घेतलं जायचं. या गावात आता सुमारे 100 माकडं राहतात. म्हणजे गाव आणि आजुबाजूच्या परिसरातील झाडांवर वस्तीला असतात आणि गावात येत राहतात. पण गेल्या काही वर्षात त्यांची संख्या रोडावलीय. कारण वन्य जनावरं ही दीर्घकाळ एकाच जागी राहत नाहीत.’ उपळा गावातील ही प्रथा फार जुनी आहे. पूर्वीच्या काळी राजे-महाराजे अशाप्रकारे काही जमीन ही देवळांसाठी, पशूंसाठी दान देत असंत. वन्य प्राण्यांचं जीवन सुरक्षित राहावे हाच त्यामागचा हेतू असावा. कारण वन्यजीव हे आपल्या पर्यावरणाचा अविभाज्य घटकच आहेत यात शंका नाही.