उर्फी जावेद
मुंबई, 5 जानेवारी : उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातला वाद काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषद घेत फक्त उर्फी जावेदच नाही तर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही निशाणा साधला आहे. पोस्टरची दखल घेणारं महिला आयोग मुंबईतल्या रस्त्यावरच्या नंगटपणाची दखल घेत नाही, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. ‘उर्फी संदर्भात महिला आयोग कोणताही कारवाई करत नाही. एका वेबसीरिजच्या पोस्टरवर कारवाई करायची. अंगप्रदर्शन होतंय म्हणून आक्षेप घ्यायचा, तर दुसरीकडे सार्वजनिकजागी बिनधास्त अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्याला क्लीन चीट द्यायची. वाह रे महिला आयोग. महिलांच्या कनवाळूपणाचं ढोंग किती करणार? आता म्हणा की ही आमची नोटीस नाही. आता म्हणा की आमचा काही आक्षेप नाही. किती तोंडावर आपटणार अजून?’ असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला. ‘पीडित महिलांना न्याय द्यायला केंद्राकडे कारवाईसाठी दाद मागण्याची गोष्ट असेल तर महिला आयोगाने हात टेकले का? स्वत: काही करायचं नाही, नुसते सल्ले द्यायचे, हा स्वत:च स्वत:ला सभ्यतेचं प्रमाणपत्र द्यायचं. लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि स्वत: मात्र कोरडे पाषाण,’ अशी टीका चित्रा वाघ यांनी महिला आयोगावर केली आहे. ‘लक्षात घ्या, भाषा नको कृती हवी. महिला आयोग हा महिलांचा सन्मान जपतो, मान राखतो आणि कोणी पीडित होऊ नये याचंही भान राखतो. उर्फीसोबत महिला आयोगही बेभान झालं का? स्वैराचाराला लगाम घालणं, ही आपली नैतिक जबाबदारी विसरू नका,’ असं चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांना सुनावलं आहे.
‘उत्तर नको, कृती करा, मग त्याचंही स्वागत करण्याचा मोठेपणा आम्ही जपतो. हे आमचे संस्कार आहेत. सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं हे योग्य आहे का? सार्वजनिक ठिकाणी उर्फीच्या बिभत्स शरीर प्रदर्शनाचं महिला आयोग समर्थन करतंय का? जर हे योग्य वाटतं तर स्पष्ट सांगा. अयोग्य वाटत असेल तर महिला आयोग म्हणून तुम्ही स्वत: दखल घेणार का? उर्फीला जाब का नाही विचारला? विरोध उर्फी या व्यक्तीला नाही तर उर्फीच्या खुलेआम उघडंनागडं शरीरप्रदर्शन या वृत्तीला आहे. कायदा कायद्याचं काम करणारचं, महिला आयोग काही करणार का नाही?’ असं बोचरा सवाल चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना विचारला.