26 एप्रिल : ज्या शेतकऱ्यांनी 22 एप्रिलपर्यंत नोंदणी केली आहे, त्यांची तूर खरेदी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली. मात्र 24 तास उलटूनही आदेशाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे आज सलग चौथ्या दिवशीही बळीराजा तूर खरेदी केंद्राबाहेर ताटकळत उभा आहे. राज्यातील शेतकरी गेल्या तीन दिवसांपासून काबाडकष्टानं पिकवलेली तूर घेऊन रस्त्यावर आहे. त्याचा आक्रोश मात्र सरकारपर्यंत पोहोचताना दिसत नाहीय. मुख्यमंत्री एखाद्या अधिकाऱ्यासारखं बोलतायत. त्यांच्या तारखेनं शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. नाफेडच्या तूर खरेदी केंद्राबाहेर शेतकऱ्यांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. लाखो क्विंटल तूर खरेदीविना पडून आहे. सरकारी केंद्रांवर तूर खरेदीची 22 एप्रिल ही अंतिम तारीख होती. त्यामुळे त्यानंतर तूर खरेदी थांबवण्यात आली. ज्या शेतकऱ्यांनी 22 एप्रिलपर्यंत किंवा त्यापूर्वी नोंदणी केली होती, त्याची तूर खरेदी केली जाईल, असा निर्णय काल सरकारने जाहीर केला. मात्र अजूनही नाफेडच्या तूर खरेदी केंद्राबाहेर शेतकऱ्यांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. सरकारच्या या निर्णयाला 24 तासांपेक्षाही अधिक काळ उलटून गेलाय. तरीही लाखो क्विंटल तूर खरेदीविना पडून आहे. विरोधक सध्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महाराष्ट्र दौरा करतायत. तर मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांची या स्थितीतून सुटका करावीच लागेल. त्यासाठी शेतकऱ्यांच्या फायद्याचा निर्णय घ्यावा लागेल. दरम्यान, मुख्यमंत्र्यांना तारीखच द्यायची असेल तर ती आता नव्यानं द्यायला लागेल. आता शेतकऱ्यांच्या नावाखाली नाफेडने व्यापाऱ्यांची तूर विकत घेतलीये, असं जर सरकारला वाटत असेल तर त्याची चौकशी व्हावी. पण खऱ्या शेतकऱ्यांची तूर सरकारला विकत घ्यावीच लागेल. तसं नाही झालं तर शेतकऱ्यांच्या असंतोषाचा स्फोट कधीही होऊ शकतो.