पूजा चव्हाण आत्महत्येनंतर (Pooja Chavan Suicide) वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod Resigns) यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द केला आहे. मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा राजीनामा मंजुर केला आहे.
रविवार, 7 फेब्रुवारी- पूजा चव्हाण नावाच्या एका टिकटॉक स्टारची आत्महत्या झाल्याची बातमी समोर आली. तिने वानवडीतील हेवन पार्क सोसायटीच्या बाल्कनीतून उडी घेवून जीव दिला. त्यानंतर हे प्रकरण पाच दिवस शांत होतं.
शुक्रवार 12 फेब्रुवारी - वानवडी पोलिसांना मृत पूजा चव्हाण मृत्यूशी संबंधित काही ऑडिओ क्लिप्स मिळाल्या. ज्यामध्ये दोन पुरूषांचा आवाज होता. यावरुन कळालं की, पूजाच्या आत्महत्या करणार असल्याची माहिती अगोदर काही लोकांना होती. हे ऑडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात महाविकास आघाडीच्या एका नेत्याचा हात असल्याचा दावा सोशल मीडियात करण्यात आला. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीची मागणी केली.
12 फेब्रुवारी-दुपारी 1.34 - भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करत करत कारवाईची मागणी केली. यावेळी त्यांनी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचं नाव घेतलं. त्यानंतर प्रकरण वाढत गेलं. अनेक माध्यमांनी हा मुद्दा उचलून धरला.
13 फेब्रुवारी- 6 pm पूजा चव्हाण हिचा पोस्ट मॉर्टेम रिपोर्टही समोर आला आहे. यानुसार पूजाच्या डोक्यावर आणि मणक्याला जखम असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. इमारतीवरुन पडल्यानंतर तिच्या डोक्यावर व मणक्याला मार लागला व त्यात तिचा मृत्यू झाला, असं सांगण्यात आलं. मात्र हा अपघात होता की आत्महत्या की घातपात याचा नेमका खुलासा झालेला नाही.
13 फेब्रुवारी 7.10 pm पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाची महिला आयोगाने दखल घेत महाराष्ट्र सरकारला नोटीस पाठवली. या आत्महत्या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसंच पुणे पोलीस आयुक्तांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे.
13 फेब्रुवारी 7.20 pm- पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मौन सोडलं आणि चौकशीचं आश्वासन दिलं. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, जे सत्य आहे ते बाहेर येईलच. त्यानंतर ज्यांच्यावर कारवाईची गरज आहे त्यांच्यावर कारवाई केली जाईल. या संदर्भात सखोल चौकशी केली जाईल. पण गेले काही दिवस काही महिने...एखाद्याला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्नं केला जातोय...असाही प्रयत्नं होता कमा नये आणि सत्यही लपवण्याचा प्रयत्न होता कामा नये,'
13 फेब्रुवारी 7.30 pm - पूजाने आत्महत्या केली नाही तर ती चक्कर येऊन पडली, असा दावा तिच्यासोबत असणाऱ्या दोन मित्रांनी केला
13 फेब्रुवारी- मृत पूजा चव्हाणची छोटी बहिण दिया चव्हाणचे इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, माझी बहिण वाघिण होती, ती असं करू शकत नाही. जर तिने आत्महत्येचा निर्णय घेतला असेल तर त्यात नक्कीच मोठं कारण असेल.
15 फेब्रुवारी : व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपमधील 'तो' आवाज माझ्या मुलाचा नाही, असा दावा अरुणच्या आईने केला होता. अरुणची आई मीराबाई सुभाष राठोड यांनी याबाबत खुलासा केला असून मीराबाई यांनी त्या ऑडिओ क्लिप मधील संभाषण हे अरुण राठोड व कथित मंत्री यांचे नसल्याचे म्हटले. सध्या अरुण कुठे आहे हे त्याच्या आईला देखील माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले.
23 फेब्रुवारी- पूजा चव्हाण प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले शिवसेनेचे नेते आणि राज्याचे वन, भूकंप पुनर्वसन मंत्री संजय राठोड अखेर 15 दिवसांनंतर समोर आले. पोहरागड याठिकाणी त्यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळाले. यावेळी त्यांना समर्थन देण्यासाठी जमलेल्या समर्थकांवर पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज केला.
24 फेब्रुवारी- राठोडांच्या या शक्तिप्रदर्शनामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही याबद्दल नाराजी व्यक्त केली. पोहोरादेवी इथं शक्तिप्रदर्शन केल्यानंतर संजय राठोड हे मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर झाले होते.
25 फेब्रुवारी : या प्रकरणाच्या तपासासाठी पुणे पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप भाजपने केला. मात्र, पोलिसांवर कोणताही दबाव नसून तपास योग्य दिशेनं सुरू आहे, असं पोलीस महासंचालक हेमंत नगराळे (hemant nagrale) यांनी स्पष्ट केलं.
25 फेब्रुवारी- वनमंत्री संजय राठोड हे 23 तारखेला शक्तीप्रदर्शन करत पोहरादेवी इथं दाखल झाले. वाशिम जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनी महंतांना नोटीस बजावल्या होत्या. मात्र तरीही बंजारा बांधव हजारोंच्या संख्येने पोहरादेवीला आल्यामुळं कोरोनाची भीती वाढली. याठिकाणी कोरोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. 22 तारखेला 30 नागरिकांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये महंत यांच्या कुटुंबातील 4 जणांसह 8 जण पॉझिटिव्ह आले होते
26 फेब्रुवारी : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात पुण्यात आता खासगी खटला दाखल करण्यात आला आहे. लिगल जस्टीस सोसायटीतर्फे लष्कर कोर्टात खटला दाखल करण्यात आला आहे. वानवडी परिसरामधे पूजा चव्हाणने आत्महत्या केली होती.
26 फेब्रुवारी : आता पूजाचं अख्खं कुटुंबच महाराष्ट्रासमोर आलं. त्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला आहे. 'माझ्या पोटचा गोळा गेला...माझी मुलगी कशी होती हे मला माहीत आहे...ती धाडसी होती...मात्र तिची आता बदनामी थांबवा...पोलीस त्यांच्या पद्धतीने तपास करतील,' असं म्हणत पूजा चव्हाण हिच्या आईनं माध्यमांसमोर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुलीविषयी होत असलेल्या चर्चेमुळे आईला वेदना होत असून त्याच अश्रूरुपाने बाहेर पडल्याचंही पाहायला मिळालं. तर तिच्या बहिणीने देखील पूजाच्या आत्महत्येविषयी शंका उपस्थित केली.
26 फेब्रुवारी : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात पुण्यात खासगी खटला दाखल करण्यात आला लिगल जस्टीस सोसायटीतर्फे लष्कर कोर्टात खटला दाखल करण्यात आला आहे. वानवडी परिसरामधे पूजा चव्हाणने आत्महत्या केली होती. मुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर पोहरादेवीला जमलेल्या 10 हजार समर्थकांवर गुन्हा दाखल
27 फेब्रुवारी: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण उचलून धरणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात एसीबीने 2016 च्या एका प्रकरणात गुन्हा दाखल केला. हा सारा प्रकार सूडबुद्धीने केला जात असल्याची टीका भाजपकडून केली जात आहे. दरम्यान चित्रा वाघ यांनी 27 फेब्रुवारीला नाशिकमध्येही हा मुद्दा उचलून धरला.
27 फेब्रुवारी: संजय राठोडांविरोधात कारवाई व्हावी आणि त्यांनी राजीनामा द्यावा याकरता राज्यभरात भाजपच्या महिला मोर्चाचं आंदोलन
28 फेब्रुवारी: दुपारी अडीचच्या सुमारास वनमंत्री संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर पोहोचले.
28 फेब्रुवारी- दुपारी 2.45 च्या सुमारास- पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणी अखेर शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना आपल्या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे सुपुर्द केला आहे. पण चौकशी झाल्यावर राजीनामा स्वीकारावा अशी विनंती संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
28 फेब्रुवारी: राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा शिवसेनेचे (Shivsena) पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांच्याकडे सुपुर्द केला आहे. मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा राजीनामा मंजूर केला आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेला मोठा झटका मानला जात आहे.