मुंबई, 2 फेब्रुवारी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली आहे. या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना फक्त मोठी स्वप्न दाखविण्यात आल्याचे ते म्हणाले होते. यानंतर मात्र भाजपचे आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका केली आहे. शेलारांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. युती तुटल्यापासून भाजप शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. मुंबईतील पश्चिम उपनगरातील अंधेरी, विले पार्ले या भागातील काही भागांत पाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. यावरुन भाजप नेते आशीष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. मुंबईकरांना चोवीस तास पाणी देऊ म्हणणा-यांनी २४ तास बार उघडे ठेवलेत असं म्हणत शेलार यांनी गेले ३ दिवस मुंबईकर पाण्यावाचून तडफडत होते अशी टीका शिवसेनेचं नाव न घेता केली आहे. गेली अनेक वर्षं मुंबईकरांसोबत ‘बनवाबनवी’ सुरु असून हे तर ‘ठग्ज ऑफ मुंबईकर’ असल्याची टीका शिवसेनेचा न घेता केली आहे.
अर्थसंकल्पावर काय म्हणाले मुख्यमंत्री केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी आज सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीशी फारकत घेतलेला आणि वास्तवाचे भान हरपून देशातील युवा, शेतकरी आणि सर्वसामान्य माणसांना केवळ स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा आहे, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. आय.डी.बी.आय आणि एलआयसीमधील आपली भागीदारी विकण्याचा घेतलेला निर्णय, रेल्वेचे खाजगीकरण यासारखे निर्णय देशाच्या खिळखिळ्या अर्थव्यवस्थेचे दर्शन घडवतात. काही शासकीय बॉण्ड परदेशी लोकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय या अर्थसंकल्पात घेतला गेला आहे, तो ही काळजी वाढवणारा आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्राची घोर निराशा या अर्थसंकल्पाने देशाचे ग्रोथ इंजिन असलेल्या मुंबई आणि महाराष्ट्रावर पुर्ण अन्याय केला आहे. मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासाला, मेट्रोला अपेक्षित असलेलं अर्थबळ या अर्थसंकल्पातून दिलं गेल्याचं दिसून येत नाही. उपनगरीय सेवा ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे, तिचा आणि प्रस्तावित रेल्वे लाइनच्या विकासाचा कुठलाही उल्लेख अर्थसंकल्पात नाही. दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या जुन्याच उल्लेखांशिवाय या अर्थसंकल्पाने राज्यातील रेल्वे विकासाला कोणतीही गती दिलेली दिसत नाही, असं सांगत उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली.