मुंबई, 6 सप्टेंबर : राज्यातील विविध भागात सध्या पाऊस सुरू होत आहे. तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस होत आहे. या पावसादरम्या, ढगांचा गडगडाटही पाहायला मिळतो आहे. यामुळे हा पाऊस परतीचा आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत झाला आहे. मात्र, हा पाऊस परतीचा नाही. तर मान्सूनची सक्रियता कमी झाली आहे. त्यामुळे हा पाऊस पडत आहे. वातावरणात उष्णता आहे. तसेच आर्द्रतेचे प्रमाणही कायम आहे. त्यामुळे ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळत आहे. दरम्यान, आता पुढच्या आठवड्यात तसेच त्यानंतरच्या कालावधीमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्णाम होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सरासरी तारखेपेक्षा उशीर होऊ शकतो, अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे. देशातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची तारीख ही सध्या सर्वसाधारण 17 सप्टेंबर आहे. तर राज्यामधून ही तारीख 5 ऑक्टोबर आहे. पुढील आठवड्याच्या शेवटी तयार होणाऱ्या प्रणालीमुळे राज्यातील पावसामध्ये वाढ होऊ शकते. तसेच दक्षिण कोकणातही याचा प्रभाव जास्त असू शकेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. हेही वाचा - बाप्पाचं विसर्जन मुसळधार पावसात; वाचा, हवामान खात्याने नेमकं काय म्हटलं?
राज्यात मागच्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. याचबरोबर दिवसभर उन आणि संध्याकाळी जोरदार पाऊस अशीच परिस्थीती बनली आहे. आज विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि तळ कोकणात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात कमाल तापमान आणि उकाड्यातील वाढ कायम राहून, ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
गेल्या 15 दिवसांपेक्षा अधिकच्या खंडानंतर मराठवाड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शुक्रवारपासून पावसाचा जोर अधिक वाढतांना पाहायला मिळाला. त्यामुळे गेल्या चार दिवसांत अपेक्षित पावसाच्या तुलनेत अधिकचा पाऊस झाला आहे. 1 ते 4 सप्टेंबरदरम्यान मराठवाड्यात 16.6 मिमी अपेक्षित पावसाच्या तुलनेत 21.5 मिमी पाऊस पडला आहे. या चार दिवसात झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाला आहे.