Mumbai: Medics walk past a new swab testing cabin at Podar hospital in Worli during a nationwide lockdown in the wake of coronavirus pandemic, in Mumbai, Sunday, April 19, 2020. (PTI Photo/Kunal Patil)(PTI19-04-2020_000179B)
मिलिंद भागवत, ठाणे, 6 जुलै : ‘ठाणे महापालिकेने मोठ्या थाटात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोव्हिड हॉस्पिटलचे उदघाटन केले. पण या हॉस्पिटलमध्ये इतका ढिसाळ कारभार चालतो की ऍडमिट केलेला रुग्ण कुठे जातो, याची कोणतीही काळजी घेण्यात येत नाही. गेले चार दिवस कळव्याचे श्री. गायकवाड हे पेशंट हॉस्पिटल मधून गायब आहेत. ते कुठे गेले याची कोणतीही माहिती प्रशासनाकडे नाही,’ असा आरोप ‘ठाणे मतदाता जागरण अभियाना’च्या सचिवांकडून करण्यात आला आहे. ‘गायकवाड यांच्या नातेवाईकांनी संपर्क केला तेव्हा मी स्वतः हॉस्पिटलमध्ये गेले. हॉस्पिटल प्रशासनाने हे मान्य केले की ते ही श्री.गायकवाड यांचा शोध घेत आहेत, पण त्यांनी याबाबत कोणत्याही पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केलेली नाही,’ असं ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या सचिव डॉ.चेतना दीक्षित यांनी म्हटलं आहे. या रुग्णाची भरती झाल्याची नोंद आहे. त्याचे पुढे काय झाले? याचा कोणताही तपशील नाही. अभियांनाच्या सचिव डॉ.चेतना दिक्षित, अनिल शाळीग्राम व रोहित जोशी आज हॉस्पिटलमध्ये त्यांच्या नातेवाईक याना घेऊन गेले, त्यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी काल कापूरबावडी पोलीस स्टेशनला माहिती दिली असल्याचे सांगितले, पण चौकशी करता त्यांच्याकडे अशी कोणतीही माहिती नाही असे पोलिसांनी सांगितले. ठाणे मतदाता जागरण अभियानाची मागणी 1) श्री. गायकवाड गायब झाल्याची पूर्ण जबाबदारी हॉस्पिटल प्रशासनाची व महापालिकेची असून याबाबत जे जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई करावी. 2) श्री.गायकवाड यांच्या नातेवाईकांना खरी व योग्य माहिती द्यावी. श्री.गायकवाड यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले असेल तर त्याची पूर्ण जबाबदारी हॉस्पिटल प्रशासनावर व त्यांच्या प्रमुखांवर राहील. 3) हॉस्पिटलमध्ये दाखल करताना व घरी जाताना व्यवस्थित नोंद केली जात नाही, या काळात पेशंटच्या नातेवाईकांना दिवसातून एकदा सर्व माहिती व फोनरून संपर्क करू दिला पाहिजे, हॉस्पिटल कडून त्यांच्या तब्येतीबाबत माहिती दिली जावी. 4) आज दाखल असलेल्या सर्व पेशंटची नावे व पत्ता रिसेप्शनमध्ये डिस्प्ले करावा, ज्यांना डिस्चार्ज दिला वा त्यांचा मृत्यू झाला ही सर्व माहिती नावानिशी बाहेर लावणे जरुरीचे आहे. 5) अधिक सुरक्षा रक्षक नेमावे, व रिस्पेशन परिसरात सी. सी. टीव्ही लावून त्याचे रेकॉर्ड सेव्ह करावे 6) श्रीमती खान यांचे काय झाले? हे जाहीर करावे. 7) आयुक्तांनी याची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानच्या डॉ.चेतना दीक्षित, अनिल शाळीग्राम व रोहित जोशी यांनी केली आहे. संपादन - अक्षय शितोळे