Sushil Kumar Shinde-Prithviraj Chavan
मुंबई, 2 सप्टेंबर : काँग्रेसमधली अंतर्गत धुसफूस काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी पक्ष सोडल्यानंतर महाराष्ट्रातले काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी काँग्रेस (Congress) पक्षश्रेष्ठींबाबत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले होते, यावरून आता सुशील कुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) यांनी चव्हाणांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. जनाधार नसणाऱ्यांना मुख्यमंत्रीपद आणि केंद्रात मंत्रिपद देण्यात आलं, तेच आता तुम्ही देणारे कोण? हे विचारत आहेत, असा टोला सुशील कुमार शिंदे यांनी हाणला. ‘जनाधार नसणाऱ्या नेत्यांना मोठ्या राज्याचं मुख्यमंत्रीपद करण्यात आलं, त्यांनीच शहाणपणा शिकवावा, यापेक्षा दुर्दैव काय?’ असा प्रश्नही सुशील कुमार शिंदे यांनी विचारला आहे. पक्षातल्या घटनेनुसारच मागच्या 24 वर्षांमध्ये नवीन कार्यकारिणी झाल्या आहेत. पक्षात लोकशाही नाही म्हणणारे, आतापर्यंत गप्प का होते? असं वक्तव्यही सुशील कुमार शिंदे यांनी केलं आहे. काय म्हणाले होते पृथ्वीराज चव्हाण? काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळावा, तसंच पक्षांतर्गत निवडणुका व्हाव्यात यासाठी 2020 साली काँग्रेसच्या 23 नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिलं होतं. पत्र लिहिणाऱ्या या नेत्यांना ग्रुप ऑफ 23 म्हणजेच G-23 म्हणून संबोधलं जातं. या G-23 मध्ये गुलाम नबी आझाद यांच्यासह पृथ्वीराज चव्हाणही होते. गुलाम नबी आझाद यांनी पक्ष सोडल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या प्रतिक्रिया स्फोटक होत्या. ‘गांधी परिवाराने तुम्हाला पदं दिली, त्यामुळे तुम्ही खूश झाले पाहिजे. काँग्रेस पक्ष म्हणजे मुघल सलतनत आहे का? काँग्रेस पक्ष कोणाचीही वैयक्तिक मालमत्ता नाही. मागच्या 24 वर्षांमध्ये पक्षात लोकशाही मार्गाने निवडणुका झालेल्या नाहीत,’ असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते.