20 एप्रिल : युतीबाबतच्या शिवसेनेच्या ताठर भूमिकेला भाजपकडूनही प्रथमच थेटपणे प्रत्युत्तर देण्यात आलंय. शिवसेनेलाच जर युती नको असेल तर मग भाजपकडूनही युतीचा प्रस्ताव मांडण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका भाजपचे राज्यातले ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलीय. तसंच पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्यास शिवसेनेचा विरोध कायम असेल तर मग बदलत्या आर्थिक वर्षानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशन हे कदाचित नागपूरला घ्यावं लागेल, अशी भूमिका आता सुधीर मुनगंटीवारांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना मांडलीय. विधानसभा 2019च्या निवडणुकीसाठी भाजपशी आम्ही युती करणार नाही हे आधीच स्पष्ट केलंय, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा आपण आपल्या निर्णयावर ठाम राहणार असल्याचं सांगितलंय. सध्या उद्धव ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय.