मुंबई, 8 ऑगस्ट : महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाल्यानंतर विधानसभेचं विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांकडे (Ajit Pawar) देण्यात आलं, तर विधानपरिषदेचं विरोधी पक्षनेतेपद (Leader of Opposition) अजूनही रिक्त आहे. विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी औरंगाबादचे विधानपरिषदेचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या नावाची शिफारस केली आहे. अंबादास दानवे यांनी उद्धव ठाकरेंच्या या शिफारसीचं पत्र विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना दिलं आहे. खरंतर विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसही आग्रही होती. राष्ट्रवादीला विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यानंतर काँग्रेसने विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची मागणी केली होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आम्हाला विधानपरिषदेचं विरोधी पक्षनेतेपद हवं असल्याचं थेट वक्तव्य केलं होतं. आता शिवसेनेने अंबादास दानवे यांच्या नावाची शिफारस करताना काँग्रेस-राष्ट्रवादीशी चर्चा केली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत अजित पवार यांना विचारलं असता त्यांनी सावध भूमिका मांडली आहे. विधानपरिषदेत सभापतीपद रिक्त आहे, तर उपसभापतीपद भरलं आहे. विधान परिषदेच्या कामकाजाबाबत उद्या बैठक आहे, यात सरकारची भूमिका काय हे विचारल्यावर पुढील निर्णय होईल, असं अजित पवार म्हणाले. विधानपरिषदेमध्ये राष्ट्रवादीचे 10 आणि काँग्रेसचे 10 आमदार आहेत. तर विधिमंडळाच्या वेबसाईटवर शिवसेनेच्या विधानपरिषदेच्या आमदारांची संख्या 12 दिसत आहे, यात उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांचा समावेश आहे. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना उद्धव ठाकरे यांनी आपण विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं होतं, पण विधिमंडळाच्या वेबसाईटवर मात्र अजूनही उद्धव ठाकरेंचं नाव दिसत आहे. 8 जुलै 2022 म्हणजेच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही यादी अपडेट करण्यात आली आहे.