मुंबईत घरं कोसळली, घटना कॅमेऱ्यात कैद
मुंबई, 25 सप्टेंबर : मुंबईतूक एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. काही घरं कोसळल्याची माहिती समोर आली आहे. रात्रीच्यावेळी सर्वजण आपापल्या घरी असतात. रात्रीचा वेळ हा निवांत कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा, एकत्र जेवणाचा आणि गप्पा मारायचा आणि नंतर झोपण्याचा वेळ असतो. मात्र, याचवेळी एखादी अनपेक्षित दुर्घटना कोसळली तर? खरंतर अशा घटनेची कल्पनाही न कलेली बरी. पण मुंबईतील अंधेरी पश्चिमेतील काही नागरिकांवर हे संकट कोसळलं आहे. मेट्रोच्या पिलरचं काम सुरु असताना शेजारी असलेल्या चाळीतील घरं आणि काही घरांची भिंती कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधेरी पश्चिमेतील मिठीबाई कॉलेजजवळ मेट्रोचे काम सुरू आहे. मेट्रोच्या पिलरचे काम सुरू असताना बाजूला असणाऱ्या चाळींच्या भिंती आणि घरे अचानक कोसळले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तातडीने बचावकार्याला सुरुवात करण्यात आलं. बचावपथकाला नागरिकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आले आहे. इंदिरानगर वनमध्ये संबंधित घटना घडली आहे. नाल्याला लागून असलेले जवळपास सात घरं कोसळले आहेत. मेट्रोच्या पिलरचं काम सुरु असताना वायब्रेशनमुळे घरं कोसळ्याची प्रथमदर्शनी माहिती समोर आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव तिथे असलेल्या 24 कुटुबांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. या दुर्घटनेत कुणीच जखमी झालेलं नाही. ही घटना घडण्याआधी काही स्थानिकांना घटनेचा अंदाज आलेला होता. त्यांनी तातडीने सर्वांना आवाज देऊन घराबाहेर काढलं होतं. त्यानंतर सर्वांना बीएमसीच्या शाळेत घेऊन जाण्यात आलं.