मुंबई, 6 जानेवारी : मुंबई -पुणे जुन्या महामार्गावर मोठा अनर्थ टळला आहे. स्कूल बसचे ब्रेक फेल झाल्यानं ही स्कूल बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली. या बसमध्ये 64 विद्यार्थी आणि 6 शिक्षक प्रवास करत होते. सुदैवानं या अपघातामध्ये कोणालाही इजा झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन विद्यार्थांना बसमधून सुखरूप बाहेर काढले आणि त्यांना दुसऱ्या बसने घेऊन जाण्याची सोय केली. बसमध्ये एकूण 70 जण घटनेबाबत अधिक माहिती अशी की, डोंबिवलीमधील भामा महात्रे विद्यामंदिर या शाळेचे विद्यार्थी एकवीरा देवीच्या दर्शनासाठी बसमधून निघाले होते. या बसमध्ये एकूण 64 विद्यार्थी आणि 6 शिक्षक प्रवास करत होते. देवीचं दर्शन घेऊन ही मुले खोपोलीतील गगनगिरी आश्रमात परतत होती, त्याचवेळी हा अपघात झाला. स्कूल बसचं ब्रेक फेल झाल्यानं बस झाडाला धडकली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन, मुलांना बसमधून सुखरूप बाहेर काढले.
सुदैवानं मोठा अपघात टळला स्कूल बसचं ब्रेक फेल झाल्यानं चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला. मात्र सुदैवान या बसमधील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक सुरक्षित असून कोणालाही इजा झाली नाही. अपघातानंतर या विद्यार्थांना दुसऱ्या बसने घरी पाठवण्यात आलं.