सातारा, 6 ऑक्टोबर : विजयादशमीनिमित्त श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या ‘जलमंदिर पॅलेस’ या निवासस्थानी दसरा दिनानिमित्त भवानी मातेच्या शाही तलवारीचे विधिवत पूजन केले. यावेळी देवीची आरती देखील करण्यात आली. आरतीनंतर श्री भवानी माता मंदिरातून या भवानी तलवारीची पारंपरिक वाद्य वाजवत पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. गेली दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने विजयादशमी साजरी केली गेली होती. या वर्षी मात्र सर्व नागरिकांना छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भेटी दिल्या. तसेच दसऱ्याच्या शुभेच्छाही दिल्या. सायंकाळच्या सुमारास पारंपरिक उत्साहाला आनंदोत्सवाची जोड देत ‘जलमंदिर’ या निवासस्थानी शाही दसरा सोहळा साजरा करण्यात आला. परंपरेनुसार सूर्यास्तानंतर संध्याकाळी सोने लुटण्याचा करण्याचा कार्यक्रम साजरा केला.
शाही सीमोल्लंघन सोहळा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज आहेत. उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस येथे वर्षानुवर्षे परंपरागत शाही सीमोल्लंघन सोहळा साजरा करण्यात येतो. छत्रपतींच्या काळापासून विजयादशमीनिमित्त मिरवणूक काढण्याची येथे परंपरा आहे. यावेळी या शाही सोहळ्याचे मोठ्या उत्साहात आयोजन झाले.