सातारा, 13 ऑक्टोबर : माणचे महाबळेश्वर म्हणून ओळख असणाऱ्या बोथे गावाच्या लाल आणि काळ्या मातीतील सेंद्रिय बटाटा सध्या भलताच भाव खाताना दिसत आहे. गटशेतीच्या माध्यमातून या गावातील तरुण शेतकऱ्यांनी बटाट्यात क्रांती केली आहे. 29 एकरात तब्बल 10 हजार क्विंटल बटाट्याचे उत्पादन घेतले आहे. तरुण शेतकऱ्यांची यशोगाथा पाहुयात या रिपोर्टमधून. सातारा जिल्ह्यातील माणच्या पश्चिम भागातील डोंगरावरील बोथे, श्रीपालवण या गावांनी गेल्या अनेक वर्षांपासून बटाटा उत्पादनात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र बेभरवशाच्या हवामानामुळे बटाटा शेतीवर मोठा परिणाम झाला आहे. संकटावर एकजुटीने मात करण्यासाठी बोथे गावातील तरुण शेतकरी गट शेतीकडे वळले. या तरुण शेतकर्यांनी माणदेश एग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनी स्थापना केली. सध्या बाजारातील ग्राहकांचा कल लक्षात घेऊन यावर्षी आधुनिक तंत्रज्ञानाचा बटाट्याचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. तज्ञांकडून घेतले प्रशिक्षण आणि माहिती सुरुवातीला शेतकर्यांच्या गटाला बटाट्याचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन कसे घ्यायचे याचे कृषी तज्ञांकडून मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले. प्रगतशील शेतकर्यांच्या शेतीस प्रत्यक्ष भेटी देण्यात आल्या. सर्व शासकीय कार्यालयांशी संपर्क साधून सेंद्रिय बटाट्याची माहिती घेतली गेली. यासाठी पाणी फाऊंडेशन टीम व कृषी अधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सेंद्रिय पद्धतीने बटाटा उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट ठेवून 29 एकरांवर बटाट्याची लागवड केली. पारंपारिक पद्धतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड लागवड करण्यापूर्वी बियाणे, सेंद्रिय खते, औषधे यांची एकत्रित व एकमताने निवड करून खरेदी केली. यामुळे खर्चात मोठी बचत झाली. आधुनिक तंत्रज्ञानाचा तसेच पारंपरिक शेती पद्धतीचा अवलंब करण्यात आला. उत्पादन घेताना पक्षी थांबे, बीज प्रक्रिया, उगवण क्षमता, दशपर्णी अर्क, जीवामृत इत्यादी बाबींचा योग्य पद्धतीने वापर करण्यात आला. कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा थोडासुद्धा वापर केला नाही. 10 वी नापास तरुणाची भरारी, विदेशी शेतीतून लाखोंची कमाई! नियोजनबद्ध प्रयत्नांना भरीव यश शेतकर्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या प्रयत्नांना भरीव यश मिळाले. 29 एकरात तब्बल 10 हजार क्विंटल बटाट्याचे उत्पादन निघाले. हा बटाटा तपासणीसाठी महाराष्ट्र शासनाच्या पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. महाराष्ट्र शासनाकडून या बटाट्यास विषमुक्त असल्याबद्दल ‘सेंद्रिय प्रमाणित प्रमाणपत्र’ मिळाले आहे.
जिल्ह्याबाहेर देखील मागणी सध्या या चवदार व सेंद्रिय बटाट्याला सोलापूर, पुणे, मुंबई, बेळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधून मागणी होत आहे. परंतु थेट ग्राहकांना विषमुक्त बटाटा मिळावा यासाठी हे शेतकरी प्रयत्नशील आहेत.