सातारा, 10 नोव्हेंबर : वडगाव हवेलीत एका शेतकऱ्यानं ड्रेनेजच्या लिकेज काढण्याबाबत ग्रामपंचायतीकडे तक्रार दिली. मात्र ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यानं थेट कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर रेडा नेला. आधी लिकेज काढा मगच रेडा खाली घेऊन जाणार अशी भूमिका त्याने घेतली. या घटनेनं ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचाऱ्यांची झोप उडाली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सातारा कराड तालुक्यातील वडगाव हवेली गावातील वैतागलेला शेतकरी चक्क रेडा घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात घुसला. तक्रार करून प्रश्न मार्गी लागत नाही म्हणून, हा सगळा उपद्व्याप त्यांनी केला आहे. या सगळ्या घटनेत रेड्याला पाहून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. शेतकऱ्याची तक्रार ऐकून घेऊन तोडगा काढला जाईल, असे आश्वासन देऊनही शेतकरी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्यामुळे तिसऱ्या मजल्यावरील ग्रामपंचायत कार्यालयात बराच वेळ गोंधळ सुरू होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सांडपाण्याचा होता त्रास शेतकऱ्याच्या राहत्या घराजवळून सांडपाण्याची पाईपलाईन गेली आहे. पाईपच्या लिकेजमुळे सांडपाणी साचून दलदल आणि दुर्गंधी पसरली आहे. कुटुंबाला त्याचा त्रास होत असल्याची तक्रार करूनही ग्रामपंचायतीने दुरूस्ती केली नाही, असा आरोप शेतकऱ्याने केला आहे. या तक्रारीकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी चक्क रेडा घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात घुसला. Satara : दिवाळीनंतर अख्ख गाव पडलं ओस, पाहा का आली गावकऱ्यांवर वेळ, Video विरोधकांनी फूस लावल्याची चर्चा वडगाव हवेली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे लवकरच बिगुल वाजणार आहे. संबंधित शेतकऱ्याला विरोधकांनी फूस लावून हा स्टंट करायला लावल्याची गावात चर्चा आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी गावच्या ‘दादा’ नेत्याला फोन करून तक्रारदाराची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तुम्ही आल्याशिवाय मी इथून उठणार नसल्याचा पवित्रा शेतकऱ्यानं घेतला होता. रेडा खाली आणताना मोठी दमछाक ग्रामपंचायत वडगाव हवेली कार्यालय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आहे. शेतकऱ्याने रेडा तिसऱ्या मजल्यावरील ग्रामपंचायत कार्यालयात आणला खरा, पण खाली आणताना शेतकऱ्यासह इतरांची चांगलीच दमछाक झाली. या प्रकाराचा व्हिडिओ कोणीही व्हायरल करायचा नाही, असे ठरले. मात्र, कोणी तरी हा व्हिडिओ व्हायरल केला आणि या घटनेची गमतीदार चर्चा सुरू झाली.