किरण मोहिते, प्रतिनिधी दरे, ,सातारा, 1 नोव्हेंबर : रोजच होत असलेलं राजकारण आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीतून ब्रेक घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी शेतात रमले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मूळगाव दरे हे सातारा जिल्ह्यातील कांदाटकी खोर्यातील डोंगरांमध्ये आणि कोयना धरणाच्या तिरावर वसलेलं आहे. .मुख्यमंत्र्यांना अगोदरपासूनच शेतीची खूप मोठी आवड असल्यामुळे त्यांनी वडिलोपार्जित असलेल्या शेतीत लक्ष घालून आपली शेती चांगल्या पद्धतीने डेव्हलप केली आहे. दोन दिवसांची सुट्टी घेत एकनाथ शिंदे शेतामध्ये काम करत आहेत. या दोन दिवसाच्या कालावधीत अख्खा एक दिवस हा शेतीसाठी दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी नुसता शेतीसाठी वेळ दिला नाही तर त्यांनी चक्क नेहमीप्रमाणे शेती करण्याचं ठरवलं आणि सकाळी शेताच्या बांधा-बांधावरुन जात शेतामध्ये ठाण मांडलं. अनेक पिकांची लागवड केली. अनेक ठिकाणी नांगरट केली. बरं या मुख्यमंत्र्यांची शेती ही काही इतर शेतकऱ्यांसाठी नाही. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात जी पिक घेतली जात नाही त्या पिकांची लागवड, त्या झाडांची लागवड चक्क आपल्या शेतात केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या शेतात कोणती पिकं? मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शेतात कोणतंच रासायनिक खत वापरलेलं नाही. त्यांच्या शेतामध्ये लवंग, वेलची,दालचिनी, कॉफी, पेरू, आंबा, फणस, चिक्कू, सफरचंद, स्ट्रॉबेरी, मिरची, हळद या सह लाल चंदन, बाहेरच्या राज्यात पिकणारे गवती चहा अशा विविध प्रकारच्या झाडांमधून त्यांनी आपली संपूर्ण शेती फुलवली आहे. एकनाथ शिंदेंच्या शेतामध्ये असलेलं गवती चहाचं पिक आगळं वेगळं आहे. या गवती चहाची उंची तब्बल 10 फुट आहे. मुख्यमंत्र्यांनी या शेतीबरोबर गोशाळा ही तयार केले आहे. गोशाळेतल्या गाईंना रसायनमुक्त असलेला चारा दिला जातो. याशिवाय मुख्यमंत्र्यांच्या शेततळ्यात मत्स्योत्पादनही केलं जातं. एकनाथ शिंदेंनी शेततळ्यात असलेल्या माशांना स्वत:च्या हाताने खाऊ घातले. संपूर्ण शिवारात फिरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इलेक्ट्रीक गाडीचा वापर केला. या गाडीचं स्टेअरिंग मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या हातात ठेवलं होतं.