मुंबई, 9 नोव्हेंबर : पत्राचाळ गैरव्यवहारांच्या आरोपांवरून अटक झालेल्या संजय राऊत यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. पीएमएलए कोर्टाने राऊत यांचा जामीन मंजूर केला. हा जामीन मंजूर करताना कोर्टाने ईडीला फटकारलं आहे. संजय राऊत आणि प्रविण राऊत यांची अटक बेकायदेशीर आहे, असं मत न्यायलयाने नोंदवलं आहे, तसंच ईडीने आपल्या मर्जीतील आरोपी निवडले. मुख्य आरोपी असलेल्या राकेश सारंग, एचडीआयएल, म्हाडा आणि सरकारी अधिकाऱ्यांना ईडीने अटक केली नाही, असंही कोर्टाने त्यांच्या कॉपीमध्ये म्हणलं आहे. ईडीने आपल्या अधिकारांचा गैरवापर केला असल्याचंही परखड मतही न्यायालयाने मांडलं आहे. संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर ईडीने याविरोधात हायकोर्टात धाव घेतली, पण हायकोर्टाने मात्र ईडीची याचिका फेटाळून लावली आणि संजय राऊत आणि प्रविण राऊत यांचा मुक्त होण्याचा मार्ग मोकळा झाला. ईडीला दिलासा द्यायला हायकोर्टाने नकार दिला. पीएमएलए कोर्टानंतर हायकोर्टनेही राऊतांचा जामीन मंजूर केला आहे, त्यामुळे संजय राऊत संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आर्थर रोड जेलच्या बाहेर यायची शक्यता आहे. मागच्या 100 दिवसांपासून संजय राऊत आर्थर रोड जेलमध्ये होते. ठाकरे गटात उत्साह दरम्यान दुसरीकडे संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर ठाकरे गटात उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. संजय राऊत यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते जमा होण्यास सुरुवात झाली असून, उत्सवाची तयारी सुरू झाली आहे.