पुणे, 09 सप्टेंबर : आज अनंत चतुर्दशी म्हणजेच आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवस आहे. यामुळे राज्यभरात गणेशाचे विसर्जन करण्यास सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने बाप्पाला दणक्यात निरोप देण्यासाठी अनेक ठिकाणी उत्साहात बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू आहे. पुण्यातही ( Pune) मोठ्या उत्साहात बाप्पांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. सकाळी दहा वाजता मंडईतील टिळक पुतळा येथून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. नाशिक ढोल, बाप्पांचा जयघोष आणि डिजेच्या तालावर थरकणाऱ्या भक्तांच्या पावलाने एक वेगळाच उत्साह पुण्यात दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मानाच्या पहिल्या कसबा गणपती मिरवणुकीत कलाकारांचे कलावंत ढोल ताशा पथक गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी सहभागी झाले. यामध्ये अभिनेता सिध्दार्थ जाधव, सौरभ गोखले, आस्ताद काळे, केतन क्षीरसागर, तेजस बर्वे तर अभिनेत्री अनुजा साठे, तेजस्विनी पंडित, श्रृती मराठे, स्वप्नाली पाटिल, नुपूर दैठणकर, शाश्वती पिंपळीकर, नीता दोंदे यांचा समावेश होता. यावेळी अभिनेता सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री तेजस्विनी पंडित, श्रुती मराठे यांच्यासह अनेक कलाकारांनी ढोल-ताशा हातात घेत बाप्पाचा जयघोष केला. त्यामुळे भाविकांसह गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला.
यावर्षी ग्रामदैवत श्री कसबा गणपती या मानाच्या पहिल्या गणपती मंडळाच्या मिरवणुकीमध्ये नगारखाना, आर्ट ऑफ लिव्हिंग, प्रभात बॅंड, कामायणी प्रशाला, बँक ऑफ इंडिया आणि रोटरी क्लबची पथके आहेत. रमणबाग, रुद्र गर्जना, आणि कलावंत ही तीन ढोल ताशा पथके मिरवणुकीत सहभागी झाली आहेत. चांदीच्या पालखीत विराजमान झालेली गणरायची मूर्ती हे या गणपतीचे वैशिष्ट्य आहे. दरम्यान, विसर्जन काळातील मुख्य मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी पुणे पोलिसांसह एसआरपीच्या 2 कंपन्या आणि 259 होमगार्ड असा बंदोबस्त सज्ज आहेत. विसर्जन मिरवणुकीच्या प्रमुख मार्गावर सी.सी.टीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून त्याच्या मदतीनं मिरवणुकीतील प्रत्येक हलचालींवर कंट्रोल रूममधून नजर ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर कोणतीही संशयित व्यक्ती किंवा वस्तू निदर्शनास आल्यास नागरिकांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाशी 112 क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.