पुणे, 16 जुलै : सध्या राज्यात पावसाने थोडीशी विश्रांती घेतली असली तरी मात्र मागच्या आठवड्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या, नाल्यांना पूर आला. तर अनेक धरणेही भरली आहेत. पावसामुळे निसर्गाचं रूपही खुललं आहे. अनेक पर्यटक पर्यंटन स्थळांना भेट देत आहेत. त्यातच आता पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर थांबून निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. काय आहे बातमी - पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर थांबून निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेणार असाल तर जरा थांबा. कारण द्रुतगती मार्गावर थांबणं तुम्हाला महागात पडू शकते. पुणे जिल्ह्यासह मावळात मुसळधार पाऊस सुरू आहे. द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजूनी छोटे, मोठे नैसर्गिक धबधबे वाहत आहेत. ते आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी किंवा सोबत फोटो काढण्यासाठी पर्यटक थांबतात. पथकेही तैनात - आता हे थांबणं त्यांना चांगलंच महागात पडू शकते. कारण असे आढळून आल्यास त्यांच्यावर MSRDC दंडात्मक कारवाई करणार आहे. अनेकदा असे थांबणे अपघाताला निमंत्रण असू शकते म्हणून दंडात्मक कारवाईचा बडगा MSRDC उगारणार आहे. तशी पथकेही तैनात करण्यात आली आहेत. हेही वाचा - पुण्यातील बेरोजगार तरुणाची आत्महत्या; ‘प्लेसमेंट होणार नाही’, या भीतीने उचलले टोकाचे पाऊल 17 जुलैपर्यंत पर्यटनास बंदी - राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातलं आहे. पुण्यातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक नदी-नाले, धबधबे दुथडी बनून वाहत आहेत. त्यामुळे अनेक अपघातं घडल्याचं समोर आलं आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील गड, किल्ले, धबधबे अशा धोकादायक ठिकाणी पर्यटनास 17 जुलैपर्यंत बंदी आणली आहे. या परिसरात 17 जुलैपर्यंत कलम 144 लागू असेल. तसेच पुणे जिल्ह्यातील पाच तालुके वगळता इतर सर्व तालुक्यांमधील शाळांना 14 ते 16 जुलैपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.