पुणे, 22 मे: पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena president) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची सभा नुकतीच पार पडली. यावेळी त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना अप्रत्यक्ष टोला मारला आहे. निवडणुका नसताना उगाच कशाला भिजत भाषण करायचं अशा शब्दात राज ठाकरेंनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. नेमकं काय म्हणाले राज ठाकरे पुण्यातल्या अनेक मैदानांनी सभांना नकार दिला. आता आम्हाला मैदान नाही, तर कुणालाच द्यायचं नाही, असं राज ठाकरेंनी म्हटलं. सध्याचे पावसाळी हवामान पाहता पावसाची शक्यता आहे. त्यामुळे उगाच कशाला पावसात भिजत भाषण करायचं?, अशा शब्दात राज ठाकरेंनी शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला मारला आहे. तसंच पावसाच्या शक्यतेमुळे हॉलमध्ये सभा घेत असल्याचंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आजच्या सभेला पोलिसांनी अटी, शर्थींवर परवानगी दिली होती. धार्मिक भावना दुखावणारी तसेच चिथावणीखोर वक्तव्ये सभेत करू नयेत, आदी विविध अटी पोलिसांनी घातल्या होत्या. मुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज पुण्यात धडाडली. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात आज ही सभा पार पडली. या सभेसाठी गणेश कला क्रीडा मंच येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सभेसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी शहरात ठिकठिकाणी फलक लावून वातावरण निर्मिती केली होती. या सभेला पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्ते उपस्थित होते.