वैभव सोनवणे, पुणे, 8 ऑगस्ट : आज सकाळपासून राज्यात माजी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या मुलींच नाव टीईटीमध्ये (TET) सेवामुक्त झालेल्या बोगस शिक्षकांच्या यादीत आलं आणि एकच गजहब झाला. अपात्र असताना पैसे देऊन पात्र होऊन नोकरी मिळावयचा हा सगळा घोटाळा आहे. हा घोटाळा नेमका आहे काय? सत्तारांच यात काय कनेक्शन आहे, ते जाणून घेउयात. राज्यात सुमारे आठ हजार बोगस शिक्षक शिकवत असल्याचं पुणे पोलिसांच्या सायबर सेलने (Pune Cyber Cell) केलेल्या तपासात उघड झालंय. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा देताना त्यात झालेल्या घोटाळ्याची माहिती सायबर पोलिसांना म्हाडा पेपर फुटी प्रकरणात मिळाली होती, ज्यात शिक्षक अपात्र असताना त्यांना पैसे घेऊन पात्र करण्यात आलं होतं. या घोटाळ्यामध्ये थेट परिक्षा परिषदेचे आयुक्तच सहभागी होते, त्यांच्यासह परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या संचालकाना आणि मध्यस्थांना पोलिसांनी अटक केली होती. हा तपास करताना पोलिसांच्या लक्षात आल होत की राज्यातल्या शाळांमध्ये सुमारे ८ हजार पेक्षा जास्त शिक्षक बोगस आहेत, त्यानंतर पोलिसांनी ही सगळी माहिती शिक्षण विभागाला कळवली आणि मग प्रत्यक्षात पात्र यादी बघून खोटी प्रमाणपत्र देणाऱ्यांची एक यादीच बनवण्यात आली. तब्बल 8,780 शिक्षकांची नाव यात उघड झाली, याचं नावांमध्ये सत्तार यांच्या तीन मुली आणि एका मुलाचं नाव असल्याचं उघड झालंय. मंत्रिमंडळ विस्ताराआधीच अचूक टायमिंग, अब्दुल सत्तारांचा करेक्ट कार्यक्रम कुणी केला? सत्तार यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेत. अपात्र झाल्यावर मुली शाळेत आल्याच नाहीत असं त्यांनी जाहीर केलंय पण त्या 2017 पासून या शाळेत पात्र नसताना कसं काय शिकवत आहेत? याचं उत्तर अजून समोर येऊ शकलेल नाही. हा प्रकार उघड झाल्यानंतर आता सत्तार यांच्या मुलीच्या अनुषंगाने चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे. सत्तार हे या प्रकरणात चूक केली नसल्याचं जाहीर सांगत आहेत, मात्र त्यांच्या मुलींची नाव परीक्षा परिषदेच्या यादीत आली आहेत. जालिंदर सुपेकर सारख्या आयएएस अधिकाऱ्याने यात सहभाग घेतल्यावर या घोटाळ्याची व्याप्ती लक्षात येते, मात्र याच प्रकरणातील खोडवे नावाचा अधिकारी जामीन मिळाल्यावर पुन्हा सेवेत रूजू करून घेतला जातो, यासारख्या अनेक कारणांमुळे व्यवस्थेवरचा सामान्यांच्या विश्वासाला तडा गेलाय तो कायमचाच.