मुलीला हॉस्पिटलमध्ये नेत असताना तिचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना पुणे जिल्ह्यातील सासवड इथं घडली
पुणे, 19 जुलै : मुलीला शाळेत सोडण्यासाठी जात असताना अचानक ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात वडिलांचा मृत्यू झाला आहे. तर मुलीला हॉस्पिटलमध्ये नेत असताना तिचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना पुणे जिल्ह्यातील सासवड इथं घडली आहे. बाप-लेकीच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील सासवड रोडवर सकाळी सात वाजेच्या सुमारास ग्लायडिंग सेंटर समोर सातववाडी इथं ही घटना घडली. निलेश साळुंखे (वय 35, रा. ढमाळवाडी, फुरसुंगी) आणि मीनाक्षी साळुंखे (वय 10) अशी अपघातात मृत्यू झालेल्या वडील आणि मुलीचे नावे आहेत. मीनाक्षी साळुंखे ही साधना विद्यालयामध्ये पाचव्या वर्गात शिकत होती. आपल्या मुलीला सोडण्यासाठी निखील साळुंखे हे फुरसुंगीहून हडपसरच्या दिशेने आपल्या दुचाकीवरून चालले होते. ग्लायडिंग सेंटर इथं पोहोचले असताना पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. ट्रकची धडक बसल्यामुळे निखील साळुंखे हे खाली कोसळले आणि ट्रकच्या चाकाखाली येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगी मीनाक्षी ही बाजूला फेकली होती. तिलाही गंभीर दुखापत झाली होती. स्थानिक नागरिकांनी तिला तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेले पण वाटेतच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रकचालक दिलीप कुमार पटेल याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. पनवेलमध्ये विचित्र अपघात, चार वाहनं धडकली दरम्यान, पनवेल तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर एका ठिकाणी पुलाचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी रात्री पाच वाहनांचा अपघात झाला. एका ट्रक ड्रायव्हरच्या चुकीने मागील चार वाहने एकमेकांवर आदळली. त्यामुळे हा सामूहिक अपघात घडला आहे. यात दोन लोकांना किरकोळ लागले असून वाहनांचे नुकसान झाले असून याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर जुने मुंबई-पुणे रस्त्यावरही एका इको आणि ट्रकमध्ये अपघात झाला. त्यातही एकाला किरकोळ लागले असून गाड्यांचे नुकसान झाले आहे. याबाबत ही पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.