पुणे, 22 जानेवारी : पुण्यातील मार्केटयार्डाजवऴील शौचालयगृहासमोरच बटाट्याच्या गाड्या थांबून बटाट्याची प्रतवारीनुसार निवडणी केली जात असल्याने यावर ग्राहकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. शौचालय व स्वच्छतागृहाशेजारी बसून भाजीपाला अथवा कोणतेही खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई केली जाऊ शकते. पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील अस्वच्छता रोखण्यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने नियमावली तयार केली आहे. मात्र शौचालयाच्या समोर बटाटे जमिनीवर पसरुन त्याची प्रतवारी केली जात आहे. गुलटेकडी बाजारात दररोज राज्यातून व परराज्यातूनही माल येत असतो. बटाटा काढणीनंतर काहीजण तो शीतगृहात ठेवतात आणि नंतरच तो माल विक्रीसाठी पाठविण्यात येतो. त्यातही चांगली प्रत असलेला बटाटा आधीच निर्यात केला जातो. आपल्याकडे येणारा बटाटा हा कमी प्रतीचा असतो. त्य़ातही अस्वच्छ ठिकाणी त्याची निवडणी केली तर असा बटाटा आरोग्यास त्रासदायक ठरू शकतो. अन्य बातम्या…
आरोग्यास धोकादायक अनेकदा मार्केटयार्डात बटाटे आणि भाज्या जमिनीवर पसरुन ठेवून प्रतवारी करतात. अशा प्रकारे खाद्यपदार्थ ठेवणे चुकीचे आहे. शौचालयासमोर ठेवलेल्य़ा या फळभाज्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता मार्केटयार्ड स्वच्छ व सुसज्ज करण्याची गरज आहे. जर येथे बेकायदेशीर गाळे असतील तर त्यावर तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. शिवाय या बटाट्यांचा वापर हाॅटेल, खाऊच्या गाड्यांवरही केला जातो. अनेकदा तिथे हवी तशी स्वच्छता ठेवली जात नाही. वडापावच्या गाडीवर बटाटा स्वच्छ धुतला जात नाही. यातून आरोग्याचे प्रश्न उद्भवू शकतात. त्यामुळे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबरोबरच अन्न व औषध प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.